IPL 2021 : CSK कडून २०० वा सामना खेळणाऱ्या धोनीने रचला इतिहास

IPL 2021 : CSK कडून २०० वा सामना खेळणाऱ्या धोनीने रचला इतिहास

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना होत आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी हा सामना खास आहे. चेन्नईकडून खेळताना हा त्याचा २०० वा सामना असून त्याने १९९ सामन्यांत या संघाचे नेतृत्व केले आहे. एका आयपीएल फ्रेंचायझींकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर असून त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून २०९ सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये धोनीने चेन्नईचे १७६, तर रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे ३० सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांचा विक्रम (२०६) धोनीच्या नावे आहे.

१७६ सामने आयपीएलमध्ये

पंजाबविरुद्ध धोनी चेन्नईकडून त्याचा २०० वा सामना खेळत आहे. त्याने यापैकी १७६ सामने आयपीएलमध्ये खेळले असून २४ सामने चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत खेळले आहेत. दरम्यान, २०१६ आणि २०१७ मध्ये चेन्नईवर बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून ३० सामने खेळले होते.

चेन्नईसाठी ४०५८ धावा

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी ४६३२ धावांसह आठव्या स्थानावर आहे. यापैकी ४०५८ धावा त्याचे चेन्नईसाठी खेळताना केल्या आहेत. तसेच तो आयपीएल सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत २१६ षटकार मारले आहेत.

First Published on: April 16, 2021 8:55 PM
Exit mobile version