IPL 2021 : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला १२ लाखांचा दंड!

IPL 2021 : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला १२ लाखांचा दंड!

रोहित शर्मा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या बलाढ्य संघांमध्ये सामना झाला. दिल्लीने या सामन्यात ६ विकेट राखून विजय मिळवला, जो त्यांचा मुंबईविरुद्ध मागील सहा सामन्यांत पहिला विजय ठरला. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला दंडही झाला. मुंबईने षटकांची गती न राखल्याने (स्लो-ओव्हर रेट) कर्णधार म्हणून रोहितला १२ लाख रुपयांचा दंड झाला. ‘२० एप्रिलला चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईने इंडियन्सने षटकांची गती न राखल्याने त्यांचा कर्णधार रोहित शर्माला दंड ठोठावण्यात आला आहे,’ असे आयपीएलकडून सांगण्यात आले.

मुंबईकडून पहिल्यांदाच चूक

यंदाच्या आयपीएलमध्ये २० षटके ९० मिनिटांत संपवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईने यंदा पहिल्यांदाच षटकांची गती न राखल्याने त्यांचा कर्णधार रोहितला १२ लाख रुपयांचा दंड झाला आहे. मात्र, पुन्हा ही चूक झाल्यास रोहितवर एका सामन्याची बंदीही येऊ शकेल. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईला चांगला खेळ करता आला नाही. मुंबईला २० षटकांत ९ बाद १३७ धावाच करता आल्या आणि दिल्लीने १३८ धावांचे लक्ष्य पाच चेंडू शिल्लक असताना गाठून हा सामना जिंकला.

अमित मिश्रा मॅचविनर

दिल्लीसाठी लेगस्पिनर अमित मिश्रा मॅचविनर ठरला. त्याने चार षटकांत २४ धावांत ४ विकेट घेतल्या. त्याने मुंबईचा कर्णधार रोहित, हार्दिक पांड्या आणि किरॉन पोलार्डसारख्या महत्वाच्या खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे दिल्लीला हा सामना जिंकता आला.

First Published on: April 21, 2021 4:26 PM
Exit mobile version