IPL 2021 : रिषभ पंतमध्ये खूप सुधारणा, कर्णधार म्हणून यशस्वी होईल – लारा

IPL 2021 : रिषभ पंतमध्ये खूप सुधारणा, कर्णधार म्हणून यशस्वी होईल – लारा

India vs West Indies : टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीमचे नव्या रणनितीवर काम, ऋषभ पंतचा खुलासा

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने मागील काही महिन्यांत त्याच्या खेळात खूप सुधारणा केली असून यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून यशस्वी होईल, असे वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लाराला वाटते. पंतने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही मालिकांमध्ये दमदार कामगिरी केली. तसेच आता श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला दिल्लीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा पंत चांगला फायदा करून घेईल असा लाराला विश्वास आहे.

संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा

पंतला मागील सहा महिन्यांत सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्याने ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. आता अय्यरला दुखापत झाल्याने त्याला आयपीएल संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळत आहे. त्याला संघातील खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा आहे. युवा कर्णधार म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मागील चार महिन्यांत पंतमध्ये झालेली सुधारणा वाखाणण्याजोगी असून तो आता कर्णधार म्हणून यशस्वी होईल, असे लारा म्हणाला.

सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य

दिल्ली कॅपिटल्सने यंदा सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सवर मात केली. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा पंतचा पहिलाच सामना होता. आता दुसऱ्या सामन्यात पंत आणि दिल्लीपुढे राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. हा सामना गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. राजस्थानचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे त्यांचा पहिला विजय मिळवण्याचे, तर दिल्लीचे सलग दुसऱ्या विजयाची नोंद करण्याचे लक्ष्य असेल.

First Published on: April 14, 2021 8:32 PM
Exit mobile version