IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्स संघात कमिन्सची जागा घेणार न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्स संघात कमिन्सची जागा घेणार न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू

कोलकाता नाईट रायडर्स संघात कमिन्सची जागा घेणार न्यूझीलंडचा खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला होता. मात्र, आता आयपीएलचा उर्वरित मोसम १९ सप्टेंबरपासून युएई येथे खेळला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलच्या या उर्वरित मोसमाला मुकणार आहे. त्याची जागा घेण्यासाठी कोलकाताने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीची संघात निवड केली आहे. ‘न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज साऊथी युएईमध्ये कोलकाताच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. साऊथीच्या गाठीशी ३०५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असून त्याने ६०३ विकेट घेतल्या आहे,’ असे कोलकाता संघाने गुरुवारी जाहीर केले.

वैयक्तिक कारणामुळे कमिन्स आऊट

मागील वर्षीच्या आयपीएल खेळाडू लिलावात कमिन्सला कोलकाताने १५.५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. यंदाच्या मोसमात सुरुवातीच्या सात सामन्यांच्या त्याने नऊ विकेट घेतानाच ९३ धावा केल्या होत्या. यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नाबाद ६६ धावांच्या खेळीचाही समावेश होता. आता वैयक्तिक कारणामुळे कमिन्स आयपीएलच्या उर्वरित मोसमाला मुकणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेला साऊथी आता आयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी कोलकाता संघात कमिन्सची जागा घेईल.

वेगवान गोलंदाजांची फळी अधिक मजबूत

साऊथी याआधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाकडून खेळला आहे. आता त्याला कोलकाता संघात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या मार्गदर्शनात खेळण्याची संधी मिळेल. साऊथी आमच्याकडून खेळणार असल्याचा आनंद आहे. तो मॅचविनर असून त्याच्या समावेशाने आमची वेगवान गोलंदाजांची फळी अधिक मजबूत होईल, असे मॅक्युलम म्हणाला.


हेही वाचा – कोहलीने प्रथम फलंदाजी घेऊन धोका पत्करला; माजी क्रिकेटपटूची टीका     


 

First Published on: August 26, 2021 9:33 PM
Exit mobile version