IPL 2021 : मैदानाबाहेरच्या परिस्थितीची आम्हाला पूर्ण कल्पना – मॉर्गन

IPL 2021 : मैदानाबाहेरच्या परिस्थितीची आम्हाला पूर्ण कल्पना – मॉर्गन

इयॉन मॉर्गन

कोरोना काळात खेळाडूंना बायो-बबलमध्ये (जैव-सुरक्षित वातावरण) राहावे लागत असले आणि खेळाडूंचा बाहेरील लोकांशी संबंध येत नसला, तरीही मैदानाबाहेरील परिस्थितीची आम्हाला पूर्ण कल्पना असल्याचे कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गन म्हणाला. भारतामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. मात्र, असे असतानाही इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा खेळवली जात असल्याने या स्पर्धेवर अनेकांनी टीका केली आहे. तसेच खेळाडू बायो-बबलमध्ये असले तरी त्यांना बाहेरील परिस्थितीचे भान असले पाहिजे, असेही म्हटले गेले आहे. यावर मॉर्गनने खेळाडू म्हणून स्पष्टीकरण दिले.

सध्याची परिस्थिती भयंकर

मैदान आणि बायो-बबलच्या बाहेरील परिस्थितीची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. सध्याची परिस्थिती खूपच भयंकर आणि आव्हानात्मक आहे. खेळाडू व सपोर्ट स्टाफसाठीही वेगळ्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागत आहेत. मात्र, आम्ही आमच्यापरीने लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. कोरोनाची स्थिती केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात गंभीर आहे, असे मॉर्गन म्हणाला. तसेच सर्वांनी मास्क लावावा आणि सोशल डिस्टंसिंग पालन करावे, असे आवाहनही त्याने लोकांना केले आहे.

ब्रेट लीचा मदतीचा हात 

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि कोलकाता नाईट रायडर्सचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. लीने भारतात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलीफला एक बिटकॉइन म्हणजेच सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारत माझ्यासाठी दुसर्‍या घरासारखा आहे. मी क्रिकेट खेळत असताना आणि निवृत्तीनंतरही लोकांकडून मला मिळालेल्या प्रेमामुळे भारताचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे, असे ली म्हणाला.

First Published on: April 27, 2021 9:30 PM
Exit mobile version