IPL 2024 KKR Vs LSG: लखनऊवर केकेआरची मोठी मात;98 धावांच्या फरकाने हरवलं

IPL 2024 KKR Vs LSG: लखनऊवर केकेआरची मोठी मात;98 धावांच्या फरकाने हरवलं

कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 98 धावांनी पराभव केला आहे.

नवी दिल्ली: IPL 2024 चा 54 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 235 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. लखनऊच्या एकना मैदानावर पहिल्यांदाच 200 प्लसचा स्कोअर करण्यात आला आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 137 धावांत सर्वबाद झाला आणि सामना 98 धावांनी गमावला. (IPL 2024 KKR Vs LSG Big win over Lucknow KKR lost by 98 runs)

कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 98 धावांनी पराभव केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा एलएसजीचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. प्रथम खेळताना केकेआरने 20 षटकांत 235 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, ज्यात सुनील नरेनच्या 81 धावांच्या झंझावाती खेळीचाही समावेश होता. लखनऊचा संघ जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. कारण अर्नीश कुलकर्णी केवळ 9 धावा करून बाद झाला. एलएसजीकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 21 चेंडूत 36 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारही ठोकले. मात्र दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडल्यामुळे स्टॉइनिसनेही दडपणाखाली विकेट गमावली. या सामन्यात सुनील नरेनने फलंदाजी करताना 81 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 1 बळीही घेतला.

236 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्या 6 षटकात 1 गडी गमावून 55 धावा केल्या. लखनऊची स्थिती चांगली असल्याचे दिसत होते, परंतु 8 व्या षटकात कर्णधार केएल राहुल 21 चेंडूत 25 धावा काढून बाद झाला. त्यांच्यापाठोपाठ दीपक हुडा आणि मार्कस स्टॉइनिसही लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले, त्यामुळे संघाने 85 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. निकोलस पुरन आणि आयुष बडोनी यांची बॅटही आज चालली नाही, जे अनुक्रमे 10 आणि 15 धावा करून बाद झाले. परिस्थिती अशी होती की 15 षटकांच्या अखेरीस लखनऊने 130 धावांवर 8 विकेट गमावल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी 106 धावांची गरज होती. LSG ची 9वी विकेट 16व्या षटकात युधवीर सिंगच्या रूपाने पडली, ज्यामुळे KKRने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हर्षित राणाने केवळ 2 धावा करणाऱ्या रवी बिश्नोईलाही बाद केले. यासह एलएसजी 137 धावांवर ऑलआऊट झाला आणि केकेआरने 98 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.

केकेआरची अप्रतिम गोलंदाजी

केकेआरने प्रथम आक्रमक फलंदाजी करत लखनऊ सुपर जायंट्सवर दबाव आणला. त्यानंतर गोलंदाजीतही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. संघाकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या, दोघांनीही आपापल्या स्पेलमध्ये 3-3 विकेट घेतल्या. दरम्यान, आंद्रे रसेल पुन्हा एकदा मधल्या षटकांमध्ये गोलंदाजीसाठी आला आणि त्याने 2 बळी घेत सामना केकेआरच्या बाजूने वळवला. मिचेल स्टार्क आणि सुनील नरेनही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यशस्वी ठरले.

केकेआर विरुद्ध एलएसजी सामन्यात मोठे विक्रम

केकेआरने प्रथम खेळताना 235 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. यापूर्वी, लखनऊविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा संघ गुजरात टायटन्स होता, ज्याने 2023 मध्ये लखनऊविरुद्ध 227 धावा केल्या होत्या. या सामन्यातील दुसरा मोठा विक्रम म्हणजे केकेआर आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या फरकाने एलएसजीला पराभूत करणारा संघ बनला आहे. यापूर्वी, ज्या संघाने एलएसजीला सर्वात मोठ्या फरकाने पराभूत केले ते मुंबई इंडियन्स होते, 2023 मध्ये एमआयने एलएसजीचा 81 धावांच्या फरकाने पराभव केला होता. आता केकेआरने केएल राहुलच्या सेनेचा 98 धावांनी पराभव केला आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : निवडणुकीनंतर दोन पक्ष मर्ज होतील किंवा अस्तित्वात नसतील; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा)


Edited By- Prajakta Parab

First Published on: May 6, 2024 8:52 AM
Exit mobile version