KKR VS LSG : फिल सॉल्टच्या फटकेबाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सने विजय

KKR VS LSG : फिल सॉल्टच्या फटकेबाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सने विजय

कोलकाता : आयपीएल 2024 च्या 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 8 विकेट्स राखून पराभव केला आहे. ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात फिल सॉल्टच्या नाबाद 89 धावांच्या दमदार खेळीमुळे कोलकाता संघाने 15.4 षटकात 162 धावांचे आव्हान पूर्ण केले. (IPL 2024 KKR VS LSG Kolkata Knight Riders win by 8 wickets Phil Salts knock)

कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली. लखनौकडून सलामीला आलेला क्विंटन डी कॉक 8 चेंडूत फक्त 10 धावा, तर कर्णधार केएल राहुल 27 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडा पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो केवळ 10 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. चौथ्या क्रमाकावर आलेल्या आयुष बदोनीने 27 चेंडूंत 29 धावांचे योगदान दिले. मात्र पाचव्या क्रमांकावरील मार्कस स्टॉइनिस 5 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. लखनऊकडून निकलस पुराणने चांगली फलंदाजी केली. त्याने 32 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 45 धावा केल्या. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सची धावसंख्या 162 धावांपर्यंत पोहोचली.

लखनऊकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाचीही खराब सुरुवात झाली. सुनील नारायण 6 चेंडूंत 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील अंगकृष्ण रघुवंशी 6 चेंडूंत 7 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर कोलकाता संघाने एकही विकेट पडू दिली नाही. सलामीवीर फिल सॉल्टने दमदार खेळी केली. त्याने 47 चेंडूंत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावा केल्या. तर कर्णधार श्रेयस अय्यरने 38 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 38 धावा करत त्याला चांगली साथ दिली. लखनऊकडून मोहसिन खानने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. याशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.

कोलकाता संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर (Kolkata team is second in the points table)

कोलकाता संघाने आतापर्यंत 5 सामने खेळताना फक्त सामना गमावला आहे आणि 4 सामने जिंकून एकूण 8 गुण कमावले आहेत. यासह कोलकाता संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. कोलकाता संघाचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध 16 एप्रिल रोजी होणार आहे.

First Published on: April 14, 2024 7:11 PM
Exit mobile version