आयपीएल लिलाव : हेटमायर, बँटन, उथप्पावर लक्ष

आयपीएल लिलाव : हेटमायर, बँटन, उथप्पावर लक्ष

आयपीएल

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धेच्या पुढील मोसमाआधी गुरुवारी कोलकाता येथे खेळाडू लिलाव होणार आहे. या लिलावात एकूण ३३२ खेळाडूंवर बोली लागणार आहे. लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या ३३२ खेळाडूंपैकी १८६ खेळाडू भारतीय, तर १४६ खेळाडू परदेशी आहेत. सध्या आयपीएलच्या आठ संघांमध्ये मिळून ७३ जागाच उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश खेळाडूंना कराराविनाच लिलावातून परतावे लागणार आहे. मात्र, दुसरीकडे वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर, इंग्लंडचा नवखा खेळाडू टॉम बँटन आणि भारताचा रॉबिन उथप्पा यांसारख्या खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

हेटमायरने सध्या सुरु असलेल्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात अप्रतिम शतक केले होते. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील पाचवे शतक होते. मागील आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला ४.२ कोटी रुपयांत खरेदी केले होते. मात्र, मागील मोसमातील ५ सामन्यांत केवळ ९० धावाच करता आल्याने लिलावाआधी बंगळुरूने त्याला करारमुक्त केले. मात्र, २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २७९ धावा करणार्‍या हेटमायरला बंगळुरुसह आठही फ्रेंचायझीस आपल्या संघात घेण्यास उत्सुक असतील. या लिलावात त्याची मूलभूत किंमत ५० लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

दुसरीकडे इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टॉम बँटनवरही फ्रेंचाइझींचे लक्ष असेल. यंदा इंग्लंडमधील स्थानिक टी-२० स्पर्धेत दमदार कामगिरी करत बँटन प्रकाशझोतात आला. सलामीवीर म्हणून खेळणार्‍या बँटनने या स्पर्धेच्या १३ सामन्यांत ४२ च्या सरासरीने आणि १६१.४७ च्या स्ट्राईक रेटने ५४९ धावा चोपून काढल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याने इंग्लंडच्या संघातही प्रवेश मिळवला. तसेच नुकत्याच झालेल्या टी-१० स्पर्धेत त्याने २०० हूनही अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

भारतीय खेळाडूंमध्ये रॉबिन उथप्पाला करारमुक्त करत कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मागील ९ मोसमांत केकेआरचे प्रतिनिधित्व केलेल्या उथप्पाला १७७ आयपीएल सामन्यांचा अनुभव असून त्यात त्याने ४४११ धावा केल्या आहेत. बर्‍याच संघांना अव्वल तीन क्रमांकावर खेळणार्‍या अनुभवी भारतीय फलंदाजाची गरज असल्याने उथप्पावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. त्याची मूलभूत किंमत दीड कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

यंदाच्या लिलावात खेळाडूंची सर्वोच्च मूळ किंमत २ कोटी इतकी आहे. या श्रेणीत पॅट कमिन्स, जॉश हेझलवूड, क्रिस लिन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेन स्टेल आणि अँजेलो मॅथ्यूज यांचा समावेश आहे. या खेळाडूंसह यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, जयदेव उनाडकट, हनुमा विहारी यांसारख्या भारतीय, तर सॅम करन, एविन लुईस, जेसन रॉय, अ‍ॅरॉन फिंच या परदेशी खेळाडूंना आठही फ्रेंचायझीस आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करतील.

मुंबई इंडियन्स
शिल्लक रक्कम – १३.०५ कोटी
एकूण रिक्त जागा – ७
परदेशी खेळाडूंच्या जागा – २

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
शिल्लक रक्कम – २७.९० कोटी
एकूण रिक्त जागा – १२
परदेशी खेळाडूंच्या जागा – ६

दिल्ली कॅपिटल्स
शिल्लक रक्कम – २७.८५ कोटी
एकूण रिक्त जागा – ११
परदेशी खेळाडूंच्या जागा – ५

राजस्थान रॉयल्स
शिल्लक रक्कम – २८.९० कोटी
एकूण रिक्त जागा- ११
परदेशी खेळाडूंच्या जागा – ४

चेन्नई सुपर किंग्स
शिल्लक रक्कम – १४.६ कोटी
एकूण रिक्त जागा – ५
परदेशी खेळाडूंच्या जागा – २

किंग्स इलेव्हन पंजाब
शिल्लक रक्कम – ४२.७० कोटी
एकूण रिक्त जागा – ९
परदेशी खेळाडूंच्या जागा – ४

कोलकाता नाईट रायडर्स
शिल्लक रक्कम – ३५.६५ कोटी
एकूण रिक्त जागा – ११
परदेशी खेळाडूंच्या जागा – ४

सनरायजर्स हैदराबाद
शिल्लक रक्कम – १७ कोटी
एकूण रिक्त जागा – ७
परदेशी खेळाडूंच्या जागा – २

First Published on: December 19, 2019 5:24 AM
Exit mobile version