IND vs AUS : खेळाडूंच्या दुखापतींना आयपीएल कारणीभूत – लँगर

IND vs AUS : खेळाडूंच्या दुखापतींना आयपीएल कारणीभूत – लँगर

जस्टिन लँगर

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा मी चाहता आहे. परंतु, ही स्पर्धा यंदा योग्य वेळी न झाल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जायबंदी होत आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी व्यक्त केले. भारताच्या तब्बल आठ खेळाडूंना दुखापतींमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. नेहमी मार्च ते मे या कालावधीत पार पडणारी आयपीएल स्पर्धा यंदा कोरोनामुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत झाली. ही स्पर्धा संपल्यावर भारताचे खेळाडू थेट ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. या सर्व गोष्टींमुळे खेळाडूंवर ताण आल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे लँगर म्हणाले.

मला आयपीएल स्पर्धा खूप आवडते. मी या स्पर्धेचा चाहता आहे. मी आता आयपीएलकडे इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटप्रमाणे पाहतो. आमचे युवा खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळवल्यावर त्यांच्या खेळात खूप सुधारणा होते. त्यांना नवा अनुभव मिळतो. मात्र, यंदा कोरोनामुळे ही स्पर्धा ज्या काळात झाली, त्याचा खेळाडूंच्या फिटनेसवर नक्कीच परिणाम झाला आहे. दोन्ही संघांचे बरेच खेळाडू जायबंदी होत असून या दुखापतींना आयपीएल काही प्रमाणात नक्कीच कारणीभूत आहे, असे लँगर यांनी सांगितले.

ज्या संघाचे सर्वाधिक खेळाडू फिट राहतील, तो संघ यशस्वी होईल, असे मी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्यापूर्वी म्हणालो होतो. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेदरम्यान आमच्या काही खेळाडूंना दुखापती झाल्या. आता भारताचे खेळाडू जायबंदी होत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला खूप महत्व आहे. इतक्या महत्वाच्या मालिकेपूर्वी आयपीएल होणे बहुधा योग्य नव्हते, असेही लँगर यांनी नमूद केले.

First Published on: January 13, 2021 9:26 PM
Exit mobile version