IRE vs SA : कर्णधार बालबर्नीचे शतक; आयर्लंडने दिला दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का

IRE vs SA : कर्णधार बालबर्नीचे शतक; आयर्लंडने दिला दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का

कर्णधार अँडी बालबर्नीचे शतक; आयर्लंडने दिला दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का

कर्णधार अँडी बालबर्नीने केलेल्या शतकाच्या जोरावर आयर्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. आयर्लंडने हा सामना ४३ धावांनी जिंकत एकदिवसीय क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेवरील पहिल्या विजयाची नोंद केली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. परंतु, दुसऱ्या सामन्यातील विजयासह आयर्लंडने तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. डब्लिन येथे झालेल्या या सामन्यात आयर्लंडचा कर्णधार बालबर्नीने ११७ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. त्यामुळे त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

टेक्टर, डॉकरेलची फटकेबाजी  

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवूमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि बालबर्नी यांनी आयर्लंडच्या डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी ६४ धावांची सलामी दिल्यावर स्टर्लिंगला (२७) केशव महाराजने बाद केले. बालबर्नीने मात्र अप्रतिम फलंदाजी करत ११४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अखेर त्याला १०२ धावांवर कागिसो रबाडाने माघारी पाठवले. यानंतर हॅरी टेक्टर (६८ चेंडूत ७९) आणि जॉर्ज डॉकरेल (२३ चेंडूत ४५) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडने ५० षटकांत ५ बाद २९० अशी धावसंख्या उभारली.

दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला

२९१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ५१ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. मात्र, यानेमन मलान (८४) आणि रॅसी वॅन डर डूसेन (४९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. हे दोघे बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. त्यामुळे २ बाद १५९ वरून दक्षिण आफ्रिकेचा डाव २४७ धावांत आटोपला आणि आयर्लंडने हा सामना ४३ धावांनी जिंकला. आयर्लंडच्या मार्क अडैर, जॉश लिटल आणि अँडी मॅकब्रिन यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

First Published on: July 14, 2021 5:13 PM
Exit mobile version