विंडीजची गाडी अखेर रुळावर?

विंडीजची गाडी अखेर रुळावर?

प्रत्येक क्रिकेट चाहत्याचा एक आपला असा संघ असतो. तो चाहता ज्या देशात जन्मला, राहिला किंवा वाढला असेल त्या देशाला पाठिंबा देतो. मात्र, आणखीही एक असा संघ असतो, जो जिंकावा असे त्याला वाटत असते. त्याची ‘दुसरी कंट्री’ म्हणा ना! बहुतांश क्रिकेट चाहत्यांची दुसरी कंट्री म्हणजे वेस्ट इंडिज. विंडीज संघातील खेळाडू सतत हसतमुख, चाहत्यांचे मनोरंजन करणारे, मोठ-मोठे फटके मारणारे असल्याने आपोआपच चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळा जिव्हाळा निर्माण होतो. विंडीजने चांगली कामगिरी करावी असे त्यांना वाटते.

विंडीज हा १९७०, ८० आणि अगदी ९० च्या दशकात जागतिक क्रिकेटमधील ‘पॉवरहाऊस’ संघ! त्यांनी १९७५ आणि १९७९ असे सुरुवातीचे दोन वर्ल्डकप जिंकले. विंडीजचा हा संघ खासकरून त्यांच्या तेजतर्रार माऱ्यासाठी प्रसिद्ध होता. माल्कम मार्शल, जोएल गार्नर, मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स असे उत्कृष्ट उंचपुरे, वेगवान गोलंदाज विंडीजकडे होते. त्यांना व्हीव रिचर्ड्स, क्लाईव्ह लॉईड, गॉर्डन ग्रिनीज, डेसमंड हेन्स यांसारख्या फलंदाजांची साथ लाभली आणि मग काय, त्यांनी क्रिकेट जगतावर वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. १९७३ ते १९९५ या कालावधीत विंडीजने परदेशात केवळ तीन कसोटी मालिका गमावल्या. मात्र, त्यानंतर हळूहळू विंडीज क्रिकेटला उतरती कळा लागली.

भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये क्रिकेट बहरत असतानाच विंडीज संघाबाबतची भीती मात्र कमी होऊ लागली. ब्रायन लारासारखा अलौकिक प्रतिभा असलेला फलंदाज विंडीजला लाभला. परंतु, त्याला इतर फलंदाजांची सातत्याने साथ लाभली नाही, अपवाद फक्त शिवनारायण चंद्रपॉलचा! कॉर्टनी वॉल्श, कर्टली अँब्रोस या जोडगोळीने विंडीजचा तेजतर्रार माऱ्याचा वारसा पुढे नेला खरा, पण या दोघांनंतर विंडीजला ‘मॅचविनर’ असा गोलंदाज मिळाला नाही.

त्यातच खेळाडू आणि विंडीज क्रिकेट बोर्ड यांच्यात सतत वाद सुरु झाले. बोर्ड आर्थिक संकटात सापडले. मग विंडीजच्या आघाडीच्या खेळाडूंना टी-२० क्रिकेटची भुरळ पडू लागली. ते विंडीजचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा विविध देशांतील टी-२० स्पर्धा खेळण्याला पसंती देऊ लागले. याचा विपरीत परिणाम विंडीजवर क्रिकेटवर होणार हे अपेक्षित होते. विंडीज संघाची खासकरून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी सातत्याने खालावत गेली. याच काळात जेसन होल्डरच्या रूपात विंडीजला एक खमका कर्णधार मिळाला.

टी-२० क्रिकेटमध्ये विंडीजला यश मिळत होते. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र विंडीजचा संघ फारच मागे पडला होता. त्यामुळे कसोटीत या संघाला पुढे आणणे म्हणजे होल्डरपुढे फार मोठे आव्हानच होते. परंतु, हळूहळू का होईना, त्याने आपल्या युवा साथीदारांना बरोबर घेऊन या संघाला पुन्हा नव्याने उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला. होल्डरच्या अष्टपैलू कामगिरीला साथ देतील असे शाई होप, रॉस्टन चेस, क्रेग ब्रेथवेट यांसारखे प्रतिभावान फलंदाज, तर किमार रोच, शॅनन गेब्रियलसारखे चांगले वेगवान गोलंदाज विंडीजला मिळाले. त्यांनी २०१८-१९ मध्ये इंग्लंडला पराभवाचा धक्का देत घरच्या मैदानावर झालेली विस्डेन मालिका जिंकली. तसेच त्यांनी बांगलादेश, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान यांनाही कसोटी मालिकेत पराभूत केले.

कोरोनामुळे चार महिने क्रिकेट बंद होते. मात्र, विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपासून पुन्हा क्रिकेटला सुरुवात झाली. ही मालिका इंग्लंडमध्ये होत असल्याने, तसेच विंडीजची फलंदाजी फारच कमकुवत मानली जात असल्याने यजमानांचे पारडे जड मानले जात होते. परंतु, गेब्रियल (९ बळी) व कर्णधार होल्डर (६ बळी) यांचा भेदक मारा आणि चौथ्या डावात एका वर्षाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जर्मेन ब्लॅकवूडची झुंजार (९५ धावा) खेळी यांच्या जोरावर विंडीजने पहिल्या कसोटीत इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला.

हा निकाल सर्वांसाठीच अनपेक्षित, पण सुखावणारा होता. विंडीज संघ हळूहळू पुन्हा प्रगतीपथावर आहे. मात्र, आता १९९५ नंतर परदेशात एखाद्या बलाढ्य संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचे होल्डरच्या संघापुढे आव्हान आहे. ते इंग्लंडविरुद्ध हा मालिकाविजयाचा दुष्काळ संपवतात का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल, हे नक्की.

First Published on: July 19, 2020 2:00 AM
Exit mobile version