ISSF World Cup : महाराष्ट्राच्या राही सरनोबतची ‘सुवर्ण’ कामगिरी

ISSF World Cup : महाराष्ट्राच्या राही सरनोबतची ‘सुवर्ण’ कामगिरी

महाराष्ट्राच्या राही सरनोबतची ‘सुवर्ण’ कामगिरी

भारताची आघाडीची नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकप (ISSF World Cup) स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. महाराष्ट्राची कन्या राहीने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. क्रोएशिया येथे होत असलेल्या यंदाच्या नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच सुवर्णपदक ठरले. याआधी भारताला एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळाली होती. भारताची स्टार युवा नेमबाज मनू भाकरला मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

३९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले

३० वर्षीय राहीने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत ३९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तिने अंतिम फेरीच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मालिकेमध्ये अचूक वेध घेतला. फ्रान्सच्या माथिलदे लमोल्लेने ३१ गुणांसह रौप्यपदक जिंकले. त्याआधी पात्रता फेरीत राहीने ५९१ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

First Published on: June 28, 2021 5:09 PM
Exit mobile version