ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामने खेळणे शक्य नाही!

ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामने खेळणे शक्य नाही!

Australia cricket captain Tim Paine (R) and India cricket captain Virat Kohli (L) pose with the Border Gavaskar trophy ahead of the first Test at the Adelaide Oval in Adelaide on December 5, 2018. (Photo by PETER PARKS / AFP) / -- IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE --

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात यंदा पाच कसोटी सामने खेळणे शक्य नाही, असे विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने केले. भारतीय संघ यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामने खेळणार आहे. करोनामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने सप्टेंबरपर्यंत आपल्या सीमा बंद ठेवल्याने भारताच्या या दौर्‍याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, भारताचा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे जवळपास ३०० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकेल. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स हा दौरा ठरल्याप्रमाणे व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच कसोटी मालिका चारऐवजी पाच सामन्यांची होईल अशी त्यांना आशा आहे. मात्र, गांगुलीला आणखी एक कसोटी सामना खेळणे अशक्य वाटते.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामने खेळणे शक्य नाही. या दौर्‍यात कसोटीसोबतच मर्यादित षटकांची मालिकाही होणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर भारतीय संघाला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे. यामुळे आधीच हा दौरा वाढणार आहे. आणखी एक कसोटी सामना खेळण्यासाठी वेळ मिळेल असे मला वाटत नाही, असे गांगुली एका मुलाखतीत म्हणाला.

त्याआधी मागील महिन्यात केविन रॉबर्ट्स यांनी भारताविरुद्ध पाच कसोटी सामने खेळण्याची आशा व्यक्त केली होती. बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत. आम्ही भविष्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याबाबत चर्चा केली आहे. दोन्ही क्रिकेट बोर्ड यासाठी उत्सुक आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका यंदाच्याच मोसमात होईल असे नाही. मात्र, याची शक्यताही नाकारता येत नाही, असे रॉबर्ट्स म्हणाले होते.

आयपीएल न झाल्यास ४००० कोटींचे नुकसान
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आयपीएल मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होत नसल्याने आयपीएल इतक्यात होण्याची शक्यता कमी आहे. आयपीएलचा मोसम न झाल्यास बीसीसीआयला तब्बल ४०० कोटींचे नुकसान होईल असे सौरव गांगुलीने सांगितले. आम्हाला आमच्या (बीसीसीआयच्या) आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल. आमच्याकडे किती पैसे आहेत हे पाहून पुढील निर्णय घ्यावे लागतील. यंदा आयपीएल न झाल्यास आमचे साधारण ४००० कोटी रुपयांचे नुकसान होईल. याऊलट आयपीएल झाले तर आम्हाला वेतन कपातीचा विचारही करावा लागणार नाही, असे गांगुलीने नमूद केले.

First Published on: May 16, 2020 6:19 AM
Exit mobile version