महिलांबाबत आक्षेपार्ह विधानांबाबत पांड्या, राहुलने मागितली माफी

महिलांबाबत आक्षेपार्ह विधानांबाबत पांड्या, राहुलने मागितली माफी

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल

’कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलियातून पुन्हा भारतात बोलवण्यात आले होते. आता सोमवारी या दोघांनी बीसीसीआयने बजावलेल्या ’कारणे दाखवा’ नोटीसचे उत्तर देताना घडलेल्या प्रकाराबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे.

त्यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. पांड्या आणि राहुलने मागितलेली माफी पुरेशी नसल्याचे बीसीसीआयच्या 10 सदस्य संघटनांचे मत आहे. याप्रकरणी लोकपाल नेमून चौकशी करण्यात यावी आणि त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे, तर याप्रकरणी बीसीसीआयचे अधिकारी आणि बीसीसीआयच्या कार्यकारी समितीकडून चौकशी करण्यात यावी, असे मत प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडुल्जी यांनी व्यक्त केले आहे.

तसेच एडुल्जी यांनी पांड्या आणि राहुल यांच्या चुकीवर पडदा टाकला जाऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली आहे. पण, प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या दोन्ही खेळाडूंच्या चुकीवर पडदा टाकला जाणार नाही याची एडुल्जी यांना हमी दिली आहे. तसेच या दोघांनाही सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे आणि त्यांची कारकीर्द संपुष्टात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे राय यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: January 15, 2019 2:34 PM
Exit mobile version