आता क्रिकेट खूप बदलले, गोलंदाज केवळ चार षटके टाकून थकतात; कपिल देव यांची टीका

आता क्रिकेट खूप बदलले, गोलंदाज केवळ चार षटके टाकून थकतात; कपिल देव यांची टीका

कपिल देव यांची आताच्या गोलंदाजांवर टीका

एकदिवसीय आणि खासकरून टी-२० क्रिकेटमुळे मागील काही वर्षांत कसोटी क्रिकेट मागे पडत चालल्याचे चित्र आहे. टी-२० क्रिकेटमधील फटकेबाजी चाहत्यांच्या पसंतीस पडते. तसेच बरेच खेळाडू कसोटी क्रिकेटपेक्षा टी-२० क्रिकेटला प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. टी-२० सामना केवळ तीन-चार तासांत संपत असून त्यामुळे खेळाडूंच्या शरीरावर फारसा ताण पडत नाही. आताच्या या बदललेल्या क्रिकेटवर भारताचे माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांनी जोरदार टीका केली आहे. आताचे क्रिकेट खूप सामान्य झाले आहे. गोलंदाज केवळ चार षटके टाकून थकत असल्याचे पाहून वाईट वाटते, अशी टीका कपिल देव यांनी केली.

जास्त षटके टाकण्याची परवानगी नाही

आताच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी यापैकी एकच गोष्ट करावी लागते. परंतु, आमच्या काळात आम्हाला सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या. आता क्रिकेट खूप बदलले आहे. गोलंदाज केवळ चार षटके टाकून थकत असल्याचे पाहून मला वाईट वाटते. आताच्या गोलंदाजांना तीन किंवा चारपेक्षा जास्त षटके टाकण्याची संघ व्यवस्थापन परवानगी देत नसल्याचे मी ऐकले आहे, असे कपिल देव म्हणाले.

आमच्या पिढीला ही गोष्ट विचित्र वाटते

आमच्या काळात अगदी १० व्या क्रमांकावरील फलंदाजालाही आम्हाला १० षटके टाकावी लागायची. हे चूक होते की बरोबर मला माहित नाही. परंतु, जास्तीतजास्त षटके टाकल्याने तुमचे शरीर अधिक बळकट होण्यास मदत होते. आताचे गोलंदाज केवळ चार षटके टाकून समाधान मानतात. त्यामुळे आमच्या पिढीला ही गोष्ट जरा विचित्र वाटते, असेही कपिल यांनी नमूद केले. कपिल यांच्यानंतर हार्दिक पांड्याकडे पुढचा महान अष्टपैलू म्हणून पाहिले जात होते. परंतु, हार्दिकला मागील काही काळात पाठीच्या दुखापतीने सतावले आहे. त्यामुळे त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले असून तो नेट्समध्येही गोलंदाजी करणे टाळत आहे.

First Published on: July 1, 2021 5:45 PM
Exit mobile version