कार्तिकला संघात घेऊन बरेच केले !

कार्तिकला संघात घेऊन बरेच केले !

अभिषेक नायरचे मत

अनुभवी दिनेश कार्तिकची विश्वचषकासाठी भारताच्या संघात राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. त्याची निवड करताना निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के प्रसाद म्हणाले की, जर धोनीला दुखापत झाली तरच त्याला संघात अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळेल. मात्र, मागील काही काळात कार्तिकला खेळ सुधारण्यासाठी मदत करणार्‍या अभिषेक नायरच्या मते भारताने कार्तिकला संघात घेऊन बरेच केले, कारण तो या संघात विविध भूमिका पार पाडू शकेल.

कार्तिक हा असा खेळाडू आहे, जो गरज पडल्यास केदार जाधवऐवजी फिनिशरची भूमिका पार पाडू शकेल. तसेच तो चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. इतकेच काय तर तो सलामीवीर म्हणूनही खेळू शकेल. त्याची या संघात राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड झाली असली तो खूप चांगला क्षेत्ररक्षकही आहे. एखादा फलंदाज जर फॉर्मात नसेल, तर कार्तिक फक्त फलंदाज म्हणूनही या संघात खेळू शकेल. त्याला कधीही संधी मिळू शकते, त्यामुळे कार्तिकने मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर केला पाहिजे, असे भारतासाठी ३ एकदिवसीय सामने खेळलेला नायर म्हणाला.

संघात निवड होणे खेळाडूच्या हातात नाही

भारताची विश्वचषकाच्या आधीची अखेरची एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली. या मालिकेसाठी कार्तिकची निवड झाली नव्हती. याचा कार्तिकवर काय परिणाम झाला होता असे विचारले असता नायर म्हणाला, आम्ही संघात परतण्याची आशा सोडली नव्हती. त्याची जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली नाही तेव्हा क्रिकेटपटू म्हणून तो कसा सुधारेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. संघात निवड होणे खेळाडूच्या हातात नसते. पण, प्रत्येक सामन्यासाठी योग्यप्रकारे तयारी करणे हे खेळाडूच्या हातात असते आणि ते आम्ही केले.

First Published on: April 17, 2019 4:12 AM
Exit mobile version