क्रिकेट, कबड्डीनंतर आता खो-खोची लीग

क्रिकेट, कबड्डीनंतर आता खो-खोची लीग

खो-खोची लीग

क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन या खेळांच्या लीगनंतर आता खो-खो या देशी खेळाचीही लीग लवकरच सुरु होणार आहे. अल्टीमेट खो-खो या लीगची घोषणा भारतीय खो-खो फेडरेशनने केली आहे. २१ दिवस चालणार्‍या या लीगमध्ये ८ फ्रँचाइझींचा समावेश असणार आहे. या फ्रँचाइझींमध्ये साखळी पद्धतीने ६० सामने खेळले जातील. या स्पर्धेचे वेळापत्रक अजून ठरले नसले तरी मुंबई, दिल्ली आणि पुणे अशा तीन ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे.

या लीगमध्ये इंग्लंड, द. कोरिया, इराण, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका अशा देशांतील खेळाडू खेळण्याची शक्यता असून १८ वर्षांखालील मुलांनाही संधी मिळणार आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी व्हीडिओद्वारे या लीगला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारतातील या लोकप्रिय खेळाला या लीगच्या माध्यमातून आणखी लोकप्रियता लाभू शकेल.

या लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तेंझिंग नियोगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आणि खो-खो फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजीव मेहता हे या लीगचे कार्याध्यक्ष आहेत. मेहता म्हणाले, २०३२च्या ऑलिम्पिकमध्ये खो-खोचा समावेश व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तसे झाले तर भारतातील दोन-तीन खेळ ऑलिम्पिकमध्ये नक्कीच येऊ शकतील.

दृष्टीक्षेप
– ८ संघांचा समावेश
– प्रत्येक संघात १२ खेळाडू
– खेळाडूंची लिलाव प्रक्रियेद्वारे निवड
– प्रत्येक संघात किमान पाच भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू असणे बंधनकारक
– परदेशातील तसेच १८ वर्षांखालील खेळाडूंचाही सहभाग
– साखळी पद्धतीने ६० सामने

First Published on: April 4, 2019 4:33 AM
Exit mobile version