कुंबळे किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदी

कुंबळे किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदी

अनिल कुंबळे

भारताचा महान क्रिकेटपटू अनिल कुंबळेची आयपीएल संघ किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. तसेच पुढील काही काळासाठी क्रिकेट संदर्भातील सर्व गोष्टींचे निर्णय कुंबळेच घेणार आहे. आयपीएलच्या पुढील मोसमात संघाचे प्रशिक्षकपद भूषवणारा कुंबळे हा एकमेव भारतीय आहे. कुंबळे १९ ऑक्टोबरला संघ व्यवस्थापनापुढे भविष्यातील योजनांबाबत एक सादरीकरण करणार आहे. याच दिवशी रविचंद्रन अश्विनच्या भविष्याबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मागील दोन मोसमांत पंजाब संघाचे नेतृत्व करणार्‍या अश्विनला आपल्या संघात घेण्यास दिल्ली कॅपिटल्स उत्सुक होते. याबाबत पंजाब आणि दिल्ली संघांमध्ये चर्चाही झाली होती. मात्र, नव्या प्रशिक्षकाची नेमणूक होईपर्यंत पंजाबने कोणताही निर्णय घेणे टाळले. त्यामुळे अश्विनबाबतचा अंतिम निर्णय कुंबळे घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच कुंबळेने अश्विनचे कौतुक केले होते. अश्विन अजूनही जगातील सर्वोत्तम फिरकीपटू आहे, असे कुंबळे म्हणाला होता. कुंबळे यांनी २०१६-१७ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते.

पाच वर्षे, पाच प्रशिक्षक
आयपीएलच्या मागील मोसमात माईक हेसन हे पंजाबचे प्रशिक्षक होते. कुंबळे हा पाच वर्षांतील पंजाबचा पाचवा प्रशिक्षक आहे. संजय बांगर यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत, त्यानंतर विरेंद्र सेहवाग, ब्रॅड हॉज आणि हेसन यांनी पंजाबचे प्रशिक्षकपद भूषवले होते. मात्र, बांगर वगळता इतर कोणाच्याही मार्गदर्शनात पंजाबला फारसे यश मिळाले नाही. पंजाबला आतापर्यंत केवळ दोन वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठता आली आहे.

First Published on: October 12, 2019 5:26 AM
Exit mobile version