La Liga : मेस्सीची विक्रमाशी बरोबरी; बार्सिलोनाची हुएस्कावर मात 

La Liga : मेस्सीची विक्रमाशी बरोबरी; बार्सिलोनाची हुएस्कावर मात 

लिओनेल मेस्सी

लिओनेल मेस्सीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोना संघाने स्पेनमधील फुटबॉल स्पर्धा ला लिगाच्या सामन्यात हुएस्का संघावर ४-१ अशी मात केली. हा बार्सिलोनाचा यंदाच्या ला लिगा स्पर्धेत २७ सामन्यांत १८ वा विजय ठरला. त्यामुळे बार्सिलोनाचे ५९ गुण झाले असून ला लिगाच्या गुणतक्त्यात हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. हुएस्काविरुद्धच्या सामन्यात बार्सिलोनाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार लिओनेल मेस्सीने अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली. बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना सर्व स्पर्धांमध्ये मिळून हा मेस्सीचा ७६७ वा सामना होता. त्यामुळे बार्सिलोनाकडून सर्वाधिक सामने खेळण्याच्या महान खेळाडू जावीच्या विक्रमाशी मेस्सीने बरोबरी केली.

७६७ सामन्यांत ६६१ गोल

मेस्सीने या सामन्यात दोन गोल करत बार्सिलोनाला विजयही मिळवून दिला. ‘मेस्सी हा बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या इतिहासातील सर्वोत्तम आणि सर्वात महत्वाचा खेळाडू आहे,’ अशा शब्दांत बार्सिलोनाचे प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी मेस्सीची स्तुती केली. मेस्सीने आतापर्यंत बार्सिलोनाकडून ७६७ सामने खेळले असून त्यात सर्वाधिक ६६१ गोल केले आहेत. हुएस्काविरुद्धचा सामना बार्सिलोनाने ४-१ असा जिंकला. या सामन्यात मेस्सीने १३ आणि ९० व्या मिनिटाला गोल केले. बार्सिलोनाचे इतर गोल अँटोन ग्रीझमन आणि ऑस्कर मिन्गुएझा यांनी गोल केले.

First Published on: March 16, 2021 9:11 PM
Exit mobile version