पुन्हा स्मिथला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनवा!

पुन्हा स्मिथला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनवा!

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथने काही दिवसांपूर्वीच झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. स्मिथ जवळपास दीड वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना या मालिकेच्या ४ सामन्यांत ७७४ धावा काढल्या. मागील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे त्यावेळी कर्णधार असलेल्या स्मिथवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

बंदीनंतर स्मिथला पुन्हा कर्णधारपद देण्याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला बराच विचार करावा लागेल असे मत बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले होते. मात्र, आता त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनवले पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगला वाटते.

स्मिथवरील बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो लगेच पुन्हा कर्णधार होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सध्या टीम पेन ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. आता त्याला कर्णधार ठेवायचे की नाही, याबाबतचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलिया घेईल. मात्र, पेनला कर्णधारपदावरून काढल्यावर किंवा तो पायउतार झाल्यावर स्टिव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्याची आणखी एक संधी मिळायला पाहिजे.

तो कर्णधार असताना ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी होईल असे मला वाटते. परंतु, त्याला नेतृत्व करण्याची इच्छा असेल आणि त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने परवानगी दिली, तरच हे शक्य आहे, असे पॉन्टिंग म्हणाला.

त्याला जबाबदारी आवडते!

स्टिव्ह स्मिथला पुन्हा कर्णधार बनवल्यास त्याच्या फलंदाजीवर परिणाम होईल का, असे विचारले असता रिकी पॉन्टिंग म्हणाला, त्याला पुन्हा कर्णधार बनवल्यास त्याच्या फलंदाजीवर परिणाम होईल असे मला वाटत नाही. त्याने आधीही कर्णधार असताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्मिथला जबाबदारी आवडते. त्याच्या नेतृत्वात जर ऑस्ट्रेलियन संघ जास्त यशस्वी होणार असेल, तर त्याला पुन्हा कर्णधार बनवले पाहिजे.

First Published on: October 16, 2019 5:00 AM
Exit mobile version