मँचेस्टर सिटीची ‘फाईव्ह’ स्टार सुरुवात

मँचेस्टर सिटीची ‘फाईव्ह’ स्टार सुरुवात

इंग्लिश प्रीमियर लीग

स्टार खेळाडू रहीम स्टर्लिंगने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर गतविजेत्या मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या नव्या मोसमाची विजयी सुरुवात केली. त्यांनी पहिल्या सामन्यात वेस्ट हॅम युनायटेडचा ५-० असा धुव्वा उडवला. त्याआधी या मोसमाच्या सर्वात पहिल्या सामन्यात मागील वर्षी दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या लिव्हरपूलने नॉर्विचचा ४-१ असा पराभव केला. त्यांच्याकडून ग्रॅन्ट हेनली (स्वयं गोल), मोहम्मद सलाह, वर्जिल वॅन डाईक आणि डीवॉक ओरीगी यांनी गोल केले. तसेच टॉटनहॅमलाही आपला सामना जिंकण्यात यश आले. स्ट्रायकर हॅरी केनचे २ गोल आणि एनडोम्बलेच्या गोलमुळे त्यांनी अ‍ॅश्टन विलावर ३-१ अशी मात केली.

लंडन स्टेडियमवर झालेल्या वेस्ट हॅम आणि मँचेस्टर सिटी यांच्यातील सामन्याची दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. मात्र, काही वेळाने मँचेस्टर सिटीने आपला खेळ उंचावला. त्यांनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली आणि याचा फायदा त्यांना २५ व्या मिनिटाला मिळाला. कायेल वॉल्करच्या पासवर स्ट्रायकर गॅब्रियल जेसूसने गोल करत मँचेस्टर सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर वेस्ट हॅम पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ३४ व्या मिनिटाला सबॅस्टियन हॉलरला गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याने मारलेला फटका थेट गोलरक्षक एडर्सनच्या हातात गेला. त्यामुळे सामन्याच्या मध्यंतराला मँचेस्टर सिटीने आपली आघाडी कायम राखली.

मध्यंतरानंतर मँचेस्टर सिटीने आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे त्यांना गोल करण्याच्या संधी मिळू लागल्या. सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला केविन डी ब्रूनच्या पासवर रहीम स्टर्लिंगने केलेल्या गोलमुळे मँचेस्टर सिटीला २-० अशी आघाडी मिळाली. दुसरीकडे वेस्ट हॅमला मिळत असलेल्या संधीचे त्यांना गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. मात्र, मँचेस्टर सिटीने आक्रमण सुरु ठेवण्याने त्यांचा ७५ व्या तिसरा गोल झाला. स्टर्लिंगनेच हा गोल केला. सामन्याच्या ८६ व्या मिनिटाला रियाद महारेजला वेस्ट हॅमच्या खेळाडूने अयोग्यरित्या पडल्यामुळे मँचेस्टर सिटीला पेनल्टी मिळाली. यावर सर्जिओ अगव्हेरोने गोल करत सिटीची आघाडी ४-० अशी वाढवली. अखेर ९० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत स्टर्लिंगने आपला तिसरा आणि संघाचा पाचवा गोल केला. त्यामुळे मँचेस्टर सिटीने हा सामना ५-० असा जिंकला. नव्या मोसमाचा पहिला सामना जिंकण्याची ही त्यांची सलग नववी वेळ होती.

निकाल :
लिव्हरपूल ४-१ नॉर्विच
वेस्ट हॅम ०-५ मँचेस्टर सिटी
क्रिस्टल पॅलेस ०-० एव्हर्टन
बर्नली ३-० साऊथहॅम्पटन
वॉटफर्ड ०-३ ब्रायटन
बॉर्नमथ १-१ शेफील्ड
टॉटनहॅम ३-१ अ‍ॅश्टन विला

First Published on: August 12, 2019 5:04 AM
Exit mobile version