IND vs AUS : तिसऱ्या कसोटीत मयांक अगरवाल-रोहित शर्माने सलामीला यावे!

IND vs AUS : तिसऱ्या कसोटीत मयांक अगरवाल-रोहित शर्माने सलामीला यावे!

रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल

सिडनी येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली पाहिजे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर क्वारंटाईनमध्ये राहावे लागल्याने रोहित पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकला होता. त्याच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत मयांक अगरवालच्या साथीने पृथ्वी शॉने सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. मात्र, या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्याने पृथ्वीला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले. त्याची जागा घेणाऱ्या शुभमन गिलने दुसऱ्या कसोटीत ४५ आणि नाबाद ३५ धावांची खेळी केली होती. मात्र, तिसऱ्या कसोटीत गिलला मधल्या फळीत खेळवण्यात आले पाहिजे असे गावस्कर यांना वाटते.

‘माझ्या मते, तिसऱ्या कसोटीत मयांक-रोहितने सलामीला खेळले पाहिजे. गिलला मधल्या फळीत खेळवून हनुमा विहारीला संघातून वगळले पाहिजे,’ असे गावस्कर म्हणाले. मयांक आणि विहारी या दोघांनाही पहिल्या दोन कसोटीत चांगला खेळ करण्यात अपयश आले. पहिल्या दोन कसोटीत मयांकला ७.७५ च्या सरासरीने केवळ ३१ धावा, तर विहारीला १५ च्या सरासरीने केवळ ४५ धावा करता आल्या. मात्र, मयांकने या मालिकेच्या आधी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि म्हणूनच भारताने त्याला आणखी एक संधी देत विहारीला संघातून वगळले पाहिजे असे गावस्कर यांना वाटते.

First Published on: December 30, 2020 10:20 PM
Exit mobile version