शिखर धवन आऊट मयांक अगरवाल इन

शिखर धवन आऊट मयांक अगरवाल इन

सौ - IB Times

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून  सलामीवीर शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे. धवनला वगळून कर्नाटकचा सलामीवीर मयांक अगरवालला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचीही संघात निवड झाली आहे.

मागील मोसमात अगरवालची दमदार कामगिरी 

मयांक अगरवालने मागील २ वर्षे भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. मागील रणजी मोसमात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने मागील मोसमात ८ सामन्यांमध्ये ११६० धावा केल्या होत्या. तर सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने ३६ डावांमध्ये २२५३ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. तर मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉचीही या संघात निवड झाली आहे. त्याची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठीही निवड झाली होती. पण आता शिखर धवन संघात नसल्याने त्याला पदार्पणाची संधी आहे.

सिराजलाही संधी 

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मागील १ वर्षात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. त्याने मागील ९ फर्स्ट-क्लास डावांत ४० विकेट घेतल्या आहे. त्याने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध एका सामन्यात ११ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची या संघात निवड झाली आहे. भुनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा हे दोघेही जायबंदी असल्याने त्यांचा विचार करण्यात आलेला नाही.
या कसोटी मालिकेचा पहिला सामना ४ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राजकोट येथे तर दुसरा सामना १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत हैद्राबाद येथे होणार आहे.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार),लोकेश राहुल,पृथ्वी शॉ,मयांक अगरवाल,चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे (उपकर्णधार),हनुमा विहारी,रिषभ पंत,रविचंद्रन अश्विन,रविंद्र जडेजा,कुलदीप यादव,मोहम्मद शमी, उमेश यादव,मोहम्मद सिराज ,शार्दुल ठाकूर

First Published on: September 30, 2018 4:12 PM
Exit mobile version