अंकुर स्पोर्ट्स क्लबने पटकावला चिंतामणी चषक

अंकुर स्पोर्ट्स क्लबने पटकावला चिंतामणी चषक

अंकुर स्पोर्ट्स क्लबने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात विजय क्लबवर २८-२४ अशी मात करत रोख रकमेचे पारितोषिक आणि चिंतामणी चषक आपल्या नावे केला. अंकुरचाच सुशांत साईल सर्वोत्तम खेळाडू ठरला.

अंकुर आणि विजय क्लब यांच्यातील अंतिम सामना सुरुवातीपासून चुरशीचा झाला. विजयच्या अक्षय सोनीने पहिल्याच चढाईत गडी टिपला. त्याला प्रतिउत्तर देत अंकुरच्या सुशांत साईलने गडी टिपत १-१ अशी बरोबरी साधली. पुढेही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी चांगला खेळ सुरु ठेवल्याने दहाव्या मिनिटापर्यंत बरोबरी राहिली. मात्र, यानंतर अंकुरने अधिक आक्रमक खेळ करत मध्यंतराला १५-१३ अशी दोन गुणांची आघाडी मिळवली.

उत्तरार्धात विजय क्लबने चांगले पुनरागमन करत २२-२२ अशी बरोबरी केली. परंतु, अक्षय मिराशीने यशस्वी पकड करत अंकुरला दोन गुणांची आघाडी मिळवून दिली, तर अभिजित दोरुगडेने बोनससह एक गडी टिपत अंकुरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुशांत साईल, अभिजित दोरुगडे यांच्या चढाया आणि किसन बोटे, अक्षय मिराशीच्या भक्कम पकडीमुळे अंकुरने हा सामना जिंकला.

त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अंकुरने जॉली स्पोर्ट्सला ३४-२९ असे, तर विजय क्लबने जय भारतला ३७-३६ असे पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघाना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आले.

सर्वोत्तम खेळाडू – सुशांत साईल (अंकुर स्पोर्ट्स)
उत्कृष्ट चढाईचा खेळाडू – अजिंक्य कापरे (विजय क्लब)
उत्कृष्ट पकडीचा खेळाडू – किसन बोटे (अंकुर स्पोर्ट्स)
स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू – अभिजित दोरुगडे (अंकुर स्पोर्ट्स)
रसिकांच्या पसंतीचा खेळाडू – अभिषेक नर (जॉली स्पोर्ट्स)

First Published on: January 8, 2020 2:07 AM
Exit mobile version