मीराबाई चानूचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित!

मीराबाई चानूचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित!

मीराबाई चानू

करोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ठरल्याप्रमाणे होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. करोनाचा फटका ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धांनाही बसला आहे. वेटलिफ्टिंग ऑलिम्पिक पात्रतेचे वेळापत्रक बिघडले आहे, पण भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार हे निश्चित आहे. तसेच युवा जेरेमी लालरिनुंगासुद्धा या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे.

नव्या नियमांनुसार ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी सहा स्पर्धांत भाग घेणे आवश्यक होते आणि मीराबाई चानू पाच स्पर्धांत सहभागी झाली होती. ती आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणार होती, पण करोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली. वेटलिफ्टरना ऑलिम्पिक पात्रतेसाठी ही अखेरची संधी होती. १७-१८ मार्चला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) काही शिफारसी केल्या होत्या.

यातील एका शिफारसीनुसार ऑलिम्पिक पात्रता जागतिक क्रमवारीनुसार ठरू शकेल. माजी विश्वविजेती चानू सध्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात तिसर्‍या स्थानावर आहे. क्रमवारीतील अव्वल आठ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करणार असल्याने चानू ऑलिम्पिकमध्ये खेळणार हे निश्चितच आहे.

First Published on: March 21, 2020 5:58 AM
Exit mobile version