धोनी ठरला बिहार-झारखंडमधला सर्वात मोठा करदाता

धोनी ठरला बिहार-झारखंडमधला  सर्वात मोठा करदाता

एमएस धोनी (सौजन्य- सिर्फ न्यूज)

सतत मैदानावर नवनवे रेकॉर्ड करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीने आता मैदानाबाहेर एक नवा रेकॉर्ड केला आहे. धोनी हा बिहार आणि झारखंड राज्यांमधला सर्वाधिक कर भरणारा करदाता ठरला आहे. धोनीने २०१७-१८ मध्ये तब्बल १२.१७ कोटी रूपये कर भरला आहे. तसेच धोनीने २०१६-१७ मध्ये १०.९३ कोटी रुपये कर भरला होता. आयकर विभागाचे मुख्य आयकर आयुक्त व्ही. महालिंगम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, धोनीने चालू वर्षात ३ कोटी रुपये आगाऊ कर भरला आहे.

बिहार-झारखंडची चांदी

राज्याबाबत सांगताना महालिंगम म्हणाले की, नोटबंदीनंतर राज्यात ३ हजार ५०० लोकांनी १० लाख रुपये अधिक कर जमा केला होता. झारखंड आयकर विभागासाठी यंदाचे वर्ष चांगले गेल्याचे महालिंगम यांनी सांगितले. २०१७-१८ मध्ये झारखंडमध्ये आयकर विभागात १० लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, मागील वर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा ८८ टक्के अधिक कर गोळा करण्यात आला आहे. यंदा २ हजार २१७ कोटी रुपये आतापर्यंत गोळा करण्यात आले आहेत. राज्यात महेंद्रसिंग धोनी हा सर्वात मोठा करदाता असल्याचेही त्यांनी सांगितले.

धोनीची ब्रँड व्हॅल्यू ७६५ कोटी

फोर्ब्सच्या माहितीनुसार २०१५ साली महेंद्रसिंग धोनीची ब्रँड व्हॅल्यू ७६५ कोटी ५१ लाख रुपये (१११ मिलियन डॉलर) होती. त्या वर्षी धोनीने तब्बल २१७ कोटी रुपये कमावले होते. त्यापैकी २४ कोटी रुपये त्याचा पगार होता. तर १९३ कोटी रुपये जाहिरातींमधून त्याने कमावले होते.

हे आहेत धोनीचे कमाईचे स्त्रोत

धोनीने कसोटी क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. त्यासोबत त्याने एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट संघाचे कर्णधारपददेखील सोडले आहे. तरिही यंदाचे वर्ष धोनीसाठी चांगले गेले आहे. यावर्षी आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. धोनीची इतरही उत्पन्नाची साधने आहेत. इंडियन सुपर लीग स्पर्धेत धोनीची फुटबॉल टीम आहे. तसेच हॉकी इंडिय लीगमधील रांची संघाचा धोनी सहमालक आहे. तसेच धोनीचा स्वत:चा कपड्यांचा ब्रॅण्डदेखील आहे. तसेच धोनी रांचीमध्ये स्वत:चे फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्याच्या तयारीत आहे.

 

 

 

First Published on: July 24, 2018 6:14 PM
Exit mobile version