रणजी करंडक : रहाणे, पृथ्वी शॉच्या कामगिरीवर नजर!

रणजी करंडक : रहाणे, पृथ्वी शॉच्या कामगिरीवर नजर!

अजिंक्य रहाणे,पृथ्वी शॉ

मुंबई आणि रेल्वेमधील रणजी करंडकातील सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होईल. ४१ वेळच्या रणजी विजेत्या मुंबईने बडोद्याचा ३०९ धावांनी धुव्वा उडवत यंदाच्या मोसमाची दिमाखात सुरुवात केली. युवा पृथ्वी शॉ आणि अनुभवी अजिंक्य रहाणे यांनी मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता रेल्वेविरुद्धच्या सामन्यातही या दोघांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच्या पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात त्याने त्याच्यातील प्रतिभेची सर्वांना आठवण करुन दिली. बडोद्याविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात पृथ्वीने पहिल्या डावात ६६ आणि दुसर्‍या डावात २०२ धावांची दमदार खेळी केली. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेच द्विशतक होते. या कामगिरीमुळे त्याची आगामी न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारत अ संघात निवड झाली आहे. आता तो रेल्वेविरुद्धही मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल.

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने बडोद्याविरुद्ध अर्धशतक झळकावत मुंबईचा पहिला डाव सावरला. रेल्वेविरुद्धही त्याच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. रहाणेला बर्‍याच काळानंतर सलग दोन रणजी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा चांगला वापर करत जास्तीतजास्त वेळ खेळपट्टीवर घालवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पृथ्वी आणि रहाणेप्रमाणेच मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. रेल्वेविरुद्ध मुंबईचा संघ चांगली कामगिरी करेल याचा कर्णधाराला विश्वास आहे.

दुसरीकडे रेल्वेसाठी यंदाच्या रणजी मोसमाची निराशाजनक सुरुवात झाली. मागील वर्षी अंतिम फेरी गाठणार्‍या सौराष्ट्राने त्यांना एक डाव राखून पराभूत केले. त्यामुळे मुंबईविरुद्ध दमदार पुनरागमन करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. याबाबत कर्णधार करण शर्मा म्हणाला की, मर्यादित खेळाडू असूनही आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. आमच्या संघाने एका सामन्यात (सौराष्ट्राविरुद्ध) खराब खेळ केला. मात्र, आता आम्ही त्याचा विचार करणार नाही. मुंबईविरुद्ध दमदार कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

First Published on: December 25, 2019 5:42 AM
Exit mobile version