माझ्या यशाचे श्रेय कर्णधार कोहलीला

माझ्या यशाचे श्रेय कर्णधार कोहलीला

Kuldeep-Kohli

चायनामन गोलंदाज कुलदीप यादव मागील १-२ वर्षांत भारताचा प्रमुख फिरकीपटू म्हणून समोर आला आहे. त्याने २०१८च्या सुरुवातीपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३० सामन्यांत ६५ विकेट, टी-२०मध्ये १० सामन्यांत २३ विकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये ४ सामन्यांत १५ विकेट घेतल्या आहेत. या त्याच्या अप्रतिम कामगिरीमुळे तो आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत सातव्या तर टी-२० क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. त्याने त्याच्या या यशाचे श्रेय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिले आहे.

कोणत्याही खेळाडूला असा कर्णधार हवा, जो तुम्हाला पाठिंबा देईल आणि जो सर्वोच्च स्तरावर तुमच्यावर विश्वास दाखवेल. जर कर्णधार विराट कोहलीने आम्हाला पाठिंबा देऊन, आम्हाला हवी तशी गोलंदाजी करायची परवानगी दिली नसती, तर आम्हाला इतके यश मिळाले असते असे तुम्हाला वाटते का? मला तसे वाटत नाही. आमच्या यशाचे श्रेय कर्णधाराला जाते, असे कुलदीपने सांगितले.

कुलदीप यंदाच्या आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करता आले नाही. ९ सामन्यांत केवळ ४ विकेट घेतल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होता. मात्र, हे अपयश विसरून ३० मेपासून सुरु होणार्‍या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याचे त्याचे लक्ष्य आहे. याबाबत तो म्हणाला, आयपीएल आणि विश्वचषक या दोन स्पर्धा खूप वेगळ्या आहेत. आपल्यासमोर असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले, पण त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडता आली नाही. मी आता परिपक्व झालो आहे आणि आयपीएलमधील खराब कामगिरीचा माझ्यावर जराही परिणाम झालेला नाही. या विश्वचषकात मी चांगली कामगिरी करू शकेन असा मला विश्वास आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तुमचा एखाद दिवस खराब असेल तर कोणताही फलंदाज तुमच्यासमोर धावा करू शकतो. प्रत्येक सामन्यात चांगले प्रदर्शन करायला मी जादूगार नाही. मला विकेट मिळत नाहीत, याचा अर्थ असा नाही की मी खराब गोलंदाजी करत आहे. मी आता परिपक्व झालो असून मी स्वतःपेक्षा संघाचा जास्त विचार करतो.

धोनीबद्दल चुकीचे काहीच बोललो नाही!                                                                                     काही दिवसांपूर्वी कुलदीप यादवने भारताचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी गोलंदाजांना बर्‍याचदा चुकीचे सल्ले देतो असे विधान केले होते. मात्र, आता त्याने यु-टर्न घेत मी धोनीबद्दल चुकीचे असे काहीच बोललोच नाही, असे म्हणाला आहे. माझ्यासारखा युवा खेळाडू इतक्या अनुभवी खेळाडूबद्दल असे विधान करेलच कसे? माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत प्रसारमाध्यमांनी आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या सल्ल्यांचा मलाच नाही तर संपूर्ण संघालाच खूप फायदा होतो. त्याच्या मार्गदर्शनाशिवाय आमचा संघ इतका यशस्वी झालाच नसता, असे कुलदीप म्हणाला.

First Published on: May 17, 2019 4:20 AM
Exit mobile version