‘या’ कारणाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर

‘या’ कारणाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा दरवर्षी २९ ऑगस्टला पार पडतो. यंदा मात्र हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. पॅरालिम्पिक स्पर्धांतील खेळाडूंची कामगिरीही लक्षात घेतली जावी या हेतून सरकारने हे पाऊल उचलले आहे. पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांचे विजेते निवडताना पॅरा खेळाडूंचाही विचार होणे गरजेचे असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे म्हणणे आहे. ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती यावर्षाकरता नेमण्यात आली आहे. परंतु, पॅरालिम्पिक स्पर्धा अजून झालेल्या नाहीत. या स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंचाही राष्ट्रीय पुरस्कारांसाठी विचार होणे गरजेचे आहे. आपले खेळाडू या स्पर्धांत चांगली कामगिरी करतील अशी आशा करतो,’ असे ठाकूर म्हणाले.

यंदाही सोहळा ऑनलाईन होण्याची शक्यता

महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. या दिवशी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार हे राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना प्रदान केले जातात. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, हा पुरस्कार सोहळा ऑनलाईन पद्धतीने झाला होता आणि यंदाही हा सोहळा ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे.

नामांकनाची प्रक्रिया समाप्त 

राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकनाच्या प्रक्रियेचा कालावधी दोन वेळा वाढवण्यात आला होता. हा कालावधी ५ जुलैला संपला असून खेळाडू व प्रशिक्षकांना स्वतः ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज देण्याची परवानगी होती. तसेच विविध राष्ट्रीय क्रीडा संघटनांनीही खेळाडूंचे नाव पुढे केले. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना सात पदके जिंकली. आता पॅरालिम्पिक स्पर्धांसाठी भारताचे ५४ खेळाडूंचे पथक टोकियोत जाणार आहे.

First Published on: August 12, 2021 8:23 PM
Exit mobile version