विंडीजपासून सावध रहाण्याची गरज

विंडीजपासून सावध रहाण्याची गरज

विरेंद्र सेहवागचे विधान

इंग्लंडमध्ये ३० मेपासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार असून ही स्पर्धा जिंकण्यासाठी यजमान इंग्लंड आणि भारत या दोन संघांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. या दोन्ही संघांनी मागील २-३ वर्षांत अप्रतिम कामगिरी केली असून जागतिक क्रमवारीत इंग्लंड पहिल्या आणि भारत दुसर्‍या स्थानी आहे. मात्र, या दोन संघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजपासूनही सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे.

या विश्वचषकात सर्वच संघ चांगले आहेत. भारत वगळता वेस्ट इंडिजपासूनही सर्वांनी सावध राहिले पाहिजे. त्यांनी अचानक मागील काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांच्याकडे फटकेबाजी करणारे आणि उत्तुंग षटकार मारणारे बरेच फलंदाज आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेने याआधी विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे त्यांना मिळालेला ’चोकर’चा टॅग पुसून काढण्यासाठी ते उत्सुक असतील.

डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाचा संघही खूप मजबूत झाला आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. यजमान इंग्लंड हा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. २०१५ विश्वचषकानंतर इयॉन मॉर्गनच्या नेतृत्त्वात आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले आहे. त्यामुळे हा विश्वचषक जिंकण्याची नक्कीच त्यांच्यात क्षमता आहे, असे सेहवाग म्हणाला.

First Published on: May 19, 2019 4:05 AM
Exit mobile version