क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची!

क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची!

कर्णधार कोहलीची माहिती

वेस्ट इंडिजने तिरुअनंतपुरम येथे झालेल्या दुसर्‍या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा ८ विकेट राखून पराभव केला. त्यामुळे त्यांनी तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीत १७० धावांची मजल मारली होती. मात्र, खराब गोलंदाजी आणि खासकरून क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे भारताला हा सामना गमवावा लागला. विंडीजविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांत भारतीय क्षेत्ररक्षकांनी बरेच झेल सोडल्याचे पहायला मिळाले आहे.

हैदराबादला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पाच, तर दुसर्‍या सामन्यात तीन झेल सोडले. हैदराबादच्या स्टेडियममधील दिवे जरा खालच्या बाजूला असल्याने क्षेत्ररक्षण करताना चेंडू दिसायला अडचण येते. मात्र, तिरुअनंतपुरम येथे हे कारण देता येणार नाही. त्यामुळे आमच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा झाली पाहिजे, असे दुसर्‍या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.

आम्ही क्षेत्ररक्षणात खूप चुका केल्या. तुम्ही जर इतके खराब क्षेत्ररक्षण केले, तर तुम्हाला कितीही धावा कमीच पडतील. दुसर्‍या सामन्यात, गोलंदाजीच्या पहिल्या चार षटकांत आम्ही विकेट मिळवण्याच्या काही संधी निर्माण केल्या. मात्र, टी-२० सामन्याच्या एकाच षटकात तुम्ही दोन झेल सोडलेत, तर तो सामना जिंकणे तुम्हाला जवळपास अशक्यच होते. एका षटकात दोन विकेट्स गमावल्यानंतर त्यांच्यावर दबाव आला असता. आम्ही या सामन्यात काय चुका केल्या याचा विचार केला पाहिजे. आम्ही क्षेत्ररक्षण खराब केले हे सर्वांनीच पाहिले आणि यात सुधारणा करणे आमच्यासाठी गरजेचे आहे, असे कोहलीने स्पष्ट केले.

First Published on: December 10, 2019 5:17 AM
Exit mobile version