भालाफेकपटू नीरज चोप्राला तुर्कस्तानहून परत बोलावले!

भालाफेकपटू नीरज चोप्राला तुर्कस्तानहून परत बोलावले!

नीरज चोप्रा

करोना विषाणूचा धोका वाढत असल्याने भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंह यांना अनुक्रमे तुर्की आणि दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतण्यास सांगण्यात आले आहे. नीरज आणि शिवपाल सराव शिबिरांमध्ये सहभागी होणार होते.

परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना मायदेशी परतण्यास सांगितले आहे, अशी माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी मंगळवारी दिली. तुर्कीहून परतणारे खेळाडू बुधवारी, तर दक्षिण आफ्रिकेहून परतणारे खेळाडू शनिवारी भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. नीरज आणि शिवपाल यावर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र झाले आहेत.

नीरज आणि रोहित यादव हे भारताचे भालाफेकपटू तुर्कीमध्ये बायोमेकेनिक्स तज्ञ क्लाउस बार्तोनिट्झ आणि फिजिओ ईशान मारवाह यांच्या मार्गदर्शनात सराव करत होते. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेहून परतणार्‍यांमध्ये शिवपाल, अन्नू राणी, विपीन कसाना, अर्शदीप सिंग हे भालाफेकपटू, तसेच प्रशिक्षक उवे हॉन यांचा समावेश आहे. बार्तोनिट्झ आणि हॉन हे जर्मनीचे नागरिक असून ते सुरक्षित भारतात यावेत यासाठी एएफआयने भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) विनंती केली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच परदेशी नागरिकांना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा देणार नसल्याचे म्हटले होते.

First Published on: March 18, 2020 5:16 AM
Exit mobile version