क्रिकेटमधील कोणतीही स्पर्धा ऑलिम्पिकच्या जवळपास नाही!

क्रिकेटमधील कोणतीही स्पर्धा ऑलिम्पिकच्या जवळपास नाही!

विरेंद्र सेहवागचे विधान

ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धांचे महत्त्व क्रिकेटमधील कोणत्याही स्पर्धेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, असे विधान भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केले. मात्र, असे असतानाही इतर खेळाडूंना क्रिकेटपटूंइतक्या सुविधा मिळत नाही, असे भारतीय क्रिकेट संघाकडून १०४ कसोटी आणि २५१ एकदिवसीय सामने खेळणार्‍या सेहवागला वाटते.

ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धा या क्रिकेटमधील कोणत्याही स्पर्धेपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. इतर खेळांमधील खेळाडूंची आपण योग्य काळजी घेत नाही, त्यांना आपण पाठिंबा देत नाही असे मला नेहमी वाटते. त्यांना चांगले आणि योग्य अन्न, ट्रेनर मिळायला पाहिजेत. मी जेव्हा इतर खेळांमधील खेळाडूंना भेटलो, तेव्हा मला लक्षात आले की त्यांना क्रिकेटपटूंच्या तुलनेत १०-२० टक्केही सुविधा मिळत नाहीत. मात्र, या परिस्थितीतही हे खेळाडू भारतासाठी पदके मिळवतात. त्यांना योग्य त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत, असे सेहवागने सांगितले.

तसेच क्रिकेटमध्ये प्रशिक्षकांना योग्य तो सन्मान आणि श्रेय दिले जात नाही, असेही सेहवागला वाटते. तो म्हणाला, क्रिकेटपटूच्या आयुष्यात प्रशिक्षकाचे खूप महत्त्व असते. मात्र, क्रिकेटपटूने चांगली कामगिरी केली की याचे श्रेय प्रशिक्षकाला दिले जात नाही. इतर खेळांमधील खेळाडू त्यांच्या प्रशिक्षकांना श्रेय देतात. परंतु, क्रिकेटपटू देशासाठी खेळायला लागले की ते प्रशिक्षकाला विसरून चांगल्या कामगिरीचे श्रेय स्वतःच घेतात. क्रिकेटपटूंना त्यांच्या प्रशिक्षकाला भेटण्याची नियमित संधी मिळत नाही हेसुद्धा खरे आहे.

First Published on: August 30, 2019 5:25 AM
Exit mobile version