सध्याच्या परिस्थितीत ऑलिम्पिकचा निर्णय अवघड!

सध्याच्या परिस्थितीत ऑलिम्पिकचा निर्णय अवघड!

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जगातील जवळपास सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, यावर्षी होणारे टोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार असे काही दिवसांपूर्वीपर्यंत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून (आयओसी) सांगण्यात येत होते. परंतु, ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी त्यांच्यावर खेळाडूंकडून दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या अवघड परिस्थितीत या स्पर्धेबाबत निर्णय घेणे सोपे नाही, अशी कबुली आयओसीने दिली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

खेळाडूंवर नकारात्मक परिणाम होणार नाही असा उपाय शोधण्याचा आयओसी प्रयत्न करत आहे. तसेच या स्पर्धेचे महत्त्व आणि खेळाडूंचे स्वास्थ्य याकडेही दुर्लक्ष होता कामा नये. सध्याच्या अवघड परिस्थितीत ऑलिम्पिकचा निर्णय घेणे सोपे नाही. त्यामुळे खेळाडूंनी एकत्रित राहून जबाबदारीने वागणे आमच्यासाठी गरजेचे आहे, असे आयओसीच्या अधिकार्‍याकडून सांगण्यात आले.

ऑलिम्पिक स्पर्धा वेळापत्रकानुसारच होणार असे काही दिवसांपूर्वी आयओसीने सांगितल्यानंतर ग्रीसची पोल वॉल्ट खेळाडू कॅथरीन स्टेफानिडी आणि ब्रिटनची हेप्टॉथ्लॉन खेळाडू कॅथरीन जॉन्सन-थॉमसन यांनी काळजी व्यक्त केली होती. दररोज सराव करुन आम्ही स्वतःसाठी, कुटुंबियांसाठी आणि इतर लोकांसाठी धोका निर्माण करावा अशी आयओसीची इच्छा आहे का?, असे स्टेफानिडीने ट्विट केले. तर ऑलिम्पिक वेळेवर होणार असल्याने माझ्यावर दररोज सराव करण्याचा दबाव आहे. सध्याची परिस्थिती विचित्र आहे आणि अशात मोसमासाठी तयारी करत राहणे अवघड आहे, असे जॉन्सन-थॉमसनने आयओसीवर टीका करताना आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले.

घाईने निर्णय नाही!
मंगळवारी जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशिमा यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक होण्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, आम्ही घाईने कोणताही निर्णय घेणार नाही, असे आयओसीकडून सांगण्यात आले.

First Published on: March 19, 2020 5:26 AM
Exit mobile version