Neeraj Chopra : …जेव्हा नीरज चोप्रा लहान मुलांना भालाफेकीचे ट्रेनिंग देतो; पंतप्रधान मोंदीनी दिली प्रतिक्रिया

Neeraj Chopra : …जेव्हा नीरज चोप्रा लहान मुलांना भालाफेकीचे ट्रेनिंग देतो; पंतप्रधान मोंदीनी दिली प्रतिक्रिया

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने आपल्या कामाने पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांची मने जिंकली आहेत. दरम्यान, नीरज चोप्रा नुकताच अहमदाबादला पोहचला आणि शाळेतील मुलांना भेटला. तिथे त्याने शाळेतील विद्यार्थ्यांना भालाफेक खेळाबाबत प्रशिक्षण दिले. सोबतच खेळ आणि फिटनेस बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला होता. नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक जिंकले होते. नीरज चोप्रा विद्यार्थ्यांना भालाफेकीबाबत प्रशिक्षण देतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“युवा खेळा़डूंमध्ये जाऊन त्यांना खेळ आणि फिटनेसबाबत जागरूक करणे, हा नीरज चोप्राचा शानदार पैलू आहे. हा ट्विटरवरील व्हिडीओ तुम्हाला आनंद देईल. चला या मोहिमेला चालू ठेवूया आणि युवा वर्गाला खेळाबद्दल प्रेरित करूया असे पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून म्हंटले.

पंतप्रधान मोदी यांनी तीन व्हिडीओ रिट्विट केल्या. एका व्हिडीओत नीरज चोप्रा मुलांना भालाफेकीचे प्रशिक्षण देताना दिसत आहे. हा व्हिडीओ अहमदाबादच्या संस्कारधाममधील आहे. दुसऱ्या व्हिडीओत नीरज चोप्रा तिरंदाजी करणाऱ्या खेळाडूंना भेटला. त्यामध्ये तो स्वत: तिरंदाजी करताना दिसत आहे. या दरम्यान नीरजने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरणा देखील दिली.

संस्कारधाममध्ये विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर नीरजने पण एक ट्विट केले. त्यात त्याने म्हंटले की, “संस्कारधाममध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भेटून चांगला दिवस राहिला. त्यांच्या सोबत खेळणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना खेळ, सराव, आणि फिटनेस का महत्त्वाचे आहे हे सांगणे हे अविस्मरणीय होते. शाळेत अभ्यासासोबत खेळालाही तितकेच महत्त्व दिले जाते हे पाहून आनंद झाला”.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ ऑगस्टला जेव्हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या खेळाडूंशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी सर्वांना आवाहन केले होते की २०२३ च्या स्वातंत्र्य दिनापर्यंत सर्वांनी ७५ विद्यालयात जावे आणि मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करावे. पंतप्रधान मोदी यांचा हा खेळ आणि फिटनेसच्या बाबतीतला उपक्रम आहे. त्याची सुरूवात नीरज चोप्राने केली आहे.


हे ही वाचा: http://AUS vs ENG Ashes Series : पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग XI ची घोषणा


 

First Published on: December 5, 2021 2:23 PM
Exit mobile version