ऑलिम्पिक पात्रता फेरी २ स्पर्धा

ऑलिम्पिक पात्रता फेरी २ स्पर्धा

फुटबॉल

डांगमे ग्रेसच्या २ गोलच्या जोरावर भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसर्‍या फेरीत इंडोनेशियावर २-० अशी मात करत २०२० टोकियो ऑलिम्पिकच्या दिशेने आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावणार्‍या भारताच्या संघाने या सामन्यात खूपच चांगला खेळ केला.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक खेळ केला. खासकरून संजू आणि रतनबाला देवी यांच्या आक्रमक खेळापुढे इंडोनेशियाची बचावफळी हतबल दिसत होती. याचाच फायदा भारताला २७ व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा संध्याने मारलेला फटका इंडोनेशियाच्या गोलकीपरने अडवला, मात्र तिला तो चेंडू गोलपासून लांब ढकलता आला नाही आणि डांगमे ग्रेसने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे भारताच्या भक्कम बचावापुढे इंडोनेशियाला गोलच्या संधी निर्माण करण्यात अपयश आले. पण, सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला डांगमे ग्रेसने पुन्हा गोल करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत राखत भारताने विजय मिळवला.

या विजयाबाबत भारताच्या प्रशिक्षक मायमोल रॉकी म्हणाल्या, आम्हाला या पात्रता फेरीची सुरुवात विजयाने करायची होती आणि आम्ही तसे केले आहे. इंडोनेशियाने आम्हाला चांगली झुंज दिली, मात्र आम्ही चांगला खेळ करून ३ गुण मिळवले. पुढेही चांगली कामगिरी सुरु ठेवणे गरजेचे आहे.

First Published on: April 4, 2019 4:23 AM
Exit mobile version