आजच्या दिवशी ठोकलं होतं सचिनने पहिलं शतक आणि मुंबईत सुरु झाली ‘लव्ह स्टोरी’

आजच्या दिवशी ठोकलं होतं सचिनने पहिलं शतक आणि मुंबईत सुरु झाली ‘लव्ह स्टोरी’

आजच्या दिवशी ठोकलं होतं सचिनने पहिलं शतक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणतात. ७ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सचिन तेंडुलकरच्या नावावर अजूनही क्रिकेटविश्वात अनेक विक्रम आहेत. सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम असो, अजूनही सचिनच्या नावावर आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक ठोकण्याचा विश्वविक्रम आहे. या शतकांची सुरुवात सचिनने ३० वर्षांपूर्वी केली होती.

सचिन तेंडुलकरने कारकिर्दीतील पहिलं शतक इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरमध्ये ठोकलं होतं. १४ ऑगस्ट १९९० रोजी सचिन तेंडुलकरने २४ वर्षांच्या कारकिर्दीतील पहिलं शतक ठोकलं होतं. त्यावेळी सचिन केवळ १७ वर्षांचा होता. सचिनने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर इंग्लंडविरुद्ध ११९ धावांची खेळी करत भारताला पराभवापासून वाचवलं होतं.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ग्रॅहॅम गूच आणि त्याचा सलामीचा साथीदार Mike Atherton यांनी शतकं ठोकली होती. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने जोरदार प्रत्युत्तर दिलं. पहिल्या डावात ४३२ धावांचा डोंगर उभा करत ८७ धावांची आघाडी मिळवली होती. यामध्ये सचिनने ६८ धावांचे योगदान दिलं होतं. इंग्लंडने आपला दुसरा डाव ३२०/४ वर घोषित करत भारताला ४०८ धावांचं लक्ष्य दिलं होतं.

धावांचा पाठलाग करताना भारताचे आघाडीची फळी ११० धावांच्या आत तंबुत परतली. भारत १२७/५ होता आणि जवळजवळ दोन सत्र शिल्लक होती. यामुळे भारत जास्त प्रतिकार करेल असं वाटत नव्हतं. सचिन तेंडुलकरने ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करत भारताला पराभवापासून वाचवलं. सचिनने १८९ चेंडूंचा सामना करत १७ चौकार ठोकत ११९ धावांची खेळी केली होती. सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या सचिनने मनोज प्रभाकरबरोबर १६० धावांची अखंड भागीदारी करत भारताची धावसंख्या ३४३/६ वर नेली आणि भारतीय संघाला पराभवापासून वाचवलं. सचिनने १४ ऑगस्टला शतक झळकावले आणि दुसर्‍या दिवशी स्वातंत्र्य दिन होता, त्यामुळे ते शतक आणखी खास बनलं.

सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन दशकांहून अधिक काळ कामगिरी करत १०० शतकं (कसोटीत ५१ आणि एकदिवसीय मालिकेत ४९ शतकं) ठोकली आहेत. हा विक्रम आजवर अखंड आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये ५३.७९ च्या सरासरीने १५ हजार ९२१ धावा केल्या. तर ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने १८ हजार ४२६ धावा कुटल्या.

…आणि या घटनेने आयुष्य बदललं

सचिन पाकिस्तानचा मुश्ताक मोहम्मद (१७ वर्षे ७८ दिवस) नंतर कसोटी शतक ठोकणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटर होता. पहिल्या इंग्लंड दौर्‍यावरुन परतताना सचिनसोबत एक घटना घडून आली ज्याने त्याचं आयुष्य बदललं. आणि इथून सहा वर्षांहून मोठी असलेल्या अंजलीवर प्रेम करून लग्नापर्यंत पोहोचण्याचा सचिनचा रोमांचक प्रवास एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही.

मुंबई विमानतळावर ती पहिली बैठक

खरं तर, इंग्लंड दौरा करुन घरी आलेल्या कुरळे केस असलेल्या सचिनने प्रथमच मुंबई विमानतळावर अंजलीला पाहिलं होतं. अंजली तिच्या मैत्रिणीसह आईला घेण्यासाठी विमानतळावर आली होती. तिची मैत्रिण डॉ. अपर्णाने सचिनला ओळखलं. आणि त्याने सचिनकडे बोट दाखवत त्यानेच इंग्लंडमध्ये शतक ठोकलं आहे, असं अंजलीला सांगितलं.

…अंजली सचिनच्या मागे धावली

हे ऐकताच ऑटोग्राफ घेण्यासाठी सचिनच्या मागे अंजली पळाली. सचिन देखील एका मुलीला त्याच्यामागे धावताना पाहून लाजू लागला. अजित आणि नितीन हे दोघे भाऊ त्याला विमानतळावर घेण्यास आले म्हणून तो शांतपणे त्यांच्या कारमध्ये बसला. सचिनसोबत बोलण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात अंजली तिच्या आईला घेण्याचं विसरली.

पाच वर्षांच्या प्रेमानंतर लग्न

“जगातील वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यापेक्षा अंजलीच्या लग्नाबद्दल कुटुंबाला विचारणं जास्त कठीण होतं. मग मी ही जबाबदारी अंजलीला दिली. अखेर जवळपास पाच वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर सचिन-अंजली एक झाले. १९९४ मध्ये न्यूझीलंडमध्ये एंगेजमेंट झाली. त्यावेळी सचिन भारतीय संघासह न्यूझीलंडच्या दौर्‍यावर होता. २४ एप्रिल रोजी दोघांनी सचिनच्या २१ व्या वाढदिवशी एंगेजमेंट केली होती. आणि एक वर्षानंतर २४ मे १९९५ रोजी सचिन-अंजलीचे लग्न झालं.

 

First Published on: August 14, 2020 9:28 AM
Exit mobile version