डोंबिवलीत ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन

डोंबिवलीत ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन

विद्यार्थी मोबाईल टिव्हीपासून लांब राहावेत यासाठी शालेय जीवनात विद्याथ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या हेतूने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे शनिवारपासून डोंबिवलीत ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धांना खेळाडूंचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे आयोजित ऑलम्पिक 2020 चा शनिवारी रोटरीचे जिल्हा गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

ऑलम्पिक 2020 मध्ये पहिलीपासून दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. लंगडी, कबड्डी, खो-खो, रस्सी खेच, फुटबॉल, व्हॉलीबॉल, डॉज बॉल, रिले, बॅटमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, योगासने स्पर्धेत सहभाग घेतला. 70 शाळांमधून जवळपास 6 हजार विद्यार्थ्यांनी आकर्षक पथसंचलन केले. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलावर हे सामने होत आहे.

यावेळी बोलताना मान्यवर मंडळींनी सांगितले की, शाळा भरण्यापूर्वी व नंतर मैदानावरील काही खेळ घ्यावेत. यासाठी विशेष प्राविण्य मिळविण्यासाठी उन्हाळी, दिवाळी सुट्ट्यांमध्ये खेळ शिबिरे घ्यावीत. मुलांचा जास्तीत जास्त रिकामा वेळ खेळातच घालवावा. बहुतांशी घरात मुले खेळायचे म्हटले तरी त्यांना पालक परवानगी देत नाहीत. मुलांवर अभ्यासाचा ताण असतो. पालकाचा धाक असतो. त्यासाठी शाळेनेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त खेळाच्या तासिकेत विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांना तणावमुक्त करुन त्यांच्या अंगी असणार्‍या सुप्त क्षमतांचा विकास होईल व शाळेकडून विद्यार्थ्यांना उत्तम खेळाडू बनण्याची संधी मिळेल असे मान्यवरांकडून सांगण्यात आले.

First Published on: January 5, 2020 5:03 AM
Exit mobile version