पी.पी.पाटील आणि बंडू कांबळेंना कबड्डीरत्न पुरस्कार

पी.पी.पाटील आणि बंडू कांबळेंना कबड्डीरत्न पुरस्कार

कबड्डीरत्न पुरस्कार विजेते

मागील काही वर्षात कबड्डी हा खेळ सर्व देशात मोठ्या उत्साहाने खेळला जात आहे, कबड्डीचा विश्वचषक तसेच ‘प्रो कबड्डी लीग’ सारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्यामुळे कबड्डीचे क्रेझ भारतात चांगलेच वाढलेले दिसत आहे.  नुकताच कबड्डी दिन सर्व देशात साजरा करण्यात आला, १५ जुलैला झालेला कबड्डी दिन मुंबईतील परेल येथील आयडियल स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीत साजरा करण्यात आला. अॅकॅडमीत झालेल्या विशेष कार्यक्रमात कबड्डीसाठी मोलाचे योगदान करणार्‍या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये ज्युनियर कॉलेज स्पोर्ट्स असोशिएशनचे कोषाध्यक्ष पी.पी.पाटील आणि राष्ट्रीय कबड्डी पंच तसेच शालेय मुंबई सुपर लीगकबड्डी समितीचे मार्गदर्शक बंडू कांबळे यांना ज्युनियर कबड्डी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कबड्डीरत्न’ पुरस्कार देण्यात आला.

कबड्डीरत्न पुरस्काराचे मानकरी डॉ. आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य पी.पी.पाटील हे महाविद्यालयीन कबड्डीमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. आंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा आयोजनात ते सक्रीय असतात. तर कबड्डी संघटक बंडू कांबळे तिन्ही हंगामातील शालेय मुंबई सुपर लीगकबड्डीमध्ये मार्गदर्शक राहिले आहेत. ते मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघटनेचे माजी संयुक्त कार्यवाह राहिले आहेत. तसेच त्यांनी गोरखनाथ महिला कबड्डी संघाची स्थापना केली असून त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही यशस्वी कामगिरी केली आहे. कबड्डी क्षेत्रात ते ४ दशके कार्यरत आहेत.
त्यांचा माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, शरीरसौष्ठवपटू वैभव मोरे, ज्युनियर कॉलेज स्पोर्ट्स असोशिएशनचे सेक्रेटरी सुनील देसले व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवचिन्ह,धनादेश, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

First Published on: July 17, 2018 7:27 PM
Exit mobile version