Papua New Guinea: वर्ल्डकप टी-२०मध्ये नवा संघ दाखल!

Papua New Guinea: वर्ल्डकप टी-२०मध्ये नवा संघ दाखल!

पपुआ न्यू गिनीचा क्रिकेट टीम!

ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप टी-२०मध्ये आता एका नव्या संघाचा समावेश झाला आहे. पपुआ न्यू गिनी (Papua New Guinea) या नव्या आफ्रिकन संघानं वर्ल्डकप क्वालिफायर टुर्नामेंटमध्ये ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे त्यांचा वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पपुआ न्यू गिनीचा क्रिकेट संघ पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. वर्ल्डकप क्वालिफायरमध्ये पपुआ न्यू गिनीने केनियाला पराभवाची धूळ चारत झोकात वर्ल्डकप स्पर्धेतलं आपलं स्थान पक्क केलं आहे. आत्तापर्यंत वर्ल्डकपसाठी ८ टीम अंतिम झाल्या असून अजून ४ टीमची नावं अंतिम होणं शिल्लक आहे.

हरता हरता जिंकले!

दरम्यान, केनियाविरूद्ध झालेल्या या विश्वचषक पात्रता सामन्यामध्ये पपुआ न्यू गिनीची टीम हरता हरता जिंकली. मॅचमध्ये जवळपास ते पराभवाच्या जवळ पोहोचले होते. मात्र, शेवटी त्यांनी केनियावर ४५ धावांनी विजय मिळवला. गेल्या काही वर्षांपासून पपुआ न्यू गिनीची टीम जागतिक स्तरावर क्रिकेट खेळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. वर्ल्डकप ही आत्तापर्यंत त्यांनी खेळलेली सर्वात मोठी टुर्नामेंट असेल.

नेदरलँडशी कडवी स्पर्धा

याच क्वालिफायर स्पर्धेमध्ये पपुआ न्यू गिनी आणि नेदरलँड हे दोन्ही संघ ५ विजय आणि १० गुणांसह बरोबरीच्या स्थानावर होते. मात्र, स्पर्धेमध्ये पपुआ न्यू गिनीचा रनरेट जास्त असल्यामुळे त्यांच्यासाठी वर्ल्डकपचा रस्ता मोकळा झाला.

काय आहे वर्ल्डकपचं वेळापत्रक?

पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात टी २० वर्ल्डकप स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. हा ७वा टी २० वर्ल्डकप असणार आहे. एकूण १२ देशांचा समावेश असलेला हा वर्ल्डकप तब्बल महिनाभर चालणार आहे. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत हे सामने होतील.

First Published on: October 30, 2019 3:02 PM
Exit mobile version