बॉक्सिंग सामन्यात ‘नॉक-आऊट’ झालेल्या पॅट्रिक डेचा मृत्यू

बॉक्सिंग सामन्यात ‘नॉक-आऊट’ झालेल्या पॅट्रिक डेचा मृत्यू

अमेरिकेचा बॉक्सर पॅट्रिक डेला मागील शनिवारी झालेल्या लढतीत चार्ल्स कॉनवेलने ‘नॉक-आऊट’ करत पराभूत केले. या लढतीदरम्यान त्याच्या मेंदूला खूप इजा पोहोचली होती. त्यामुळे २७ वर्षीय पॅट्रिक कोमात गेला होता. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, दुर्दैवाने बुधवारी त्याचा मृत्यू झाला. शनिवार १२ ऑक्टोबरला झालेल्या बॉक्सिंग सामन्यात मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे 16 ऑक्टोबर रोजी पॅट्रिक डेचे शिकागो येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले, अशी माहिती पॅट्रिकचे प्रोमोटर लू डीबेला यांनी दिली.

चार्ल्स कॉनवेलने शनिवारी झालेल्या सामन्याच्या दहाव्या फेरीत पॅट्रिक डे वर ‘नॉक-आऊट’ने विजय मिळवला होता. मला तो सामना जिंकायचा होता, पण अशाप्रकारे नाही, असे म्हणत कॉनवेलने ट्विटरवरून पॅट्रिकला आदरांजली वाहिली. कोणत्याही बॉक्सरबाबत असे होऊ नये. मी त्या सामन्याचा सारखा विचार करत आहे. तो सामना झालाच नसता तर काय झाले असते आणि हे तुझ्यासोबतच का झाले, असा विचार माझ्या मनात येत आहे. मी बॉक्सिंग सोडण्याचा विचार करत होतो, पण तुला हे आवडणार नाही, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले.

यावर्षी जुलैपासून बॉक्सरने लढतीदरम्यान दुखापत झाल्यानंतर प्राण गमावल्याची ही तिसरी वेळ आहे. जुलैमध्ये अर्जेंटिनाच्या २३ वर्षीय बॉक्सर ह्युगो सॅन्तिलानचा, तर त्याआधी दोन दिवस २८ वर्षीय रशियाच्या मॅक्सिम दादाशेव्हचा सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर मृत्यू झाला होता.

First Published on: October 18, 2019 5:39 AM
Exit mobile version