…त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जरा जास्तच स्लेजिंग करत होते!

…त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जरा जास्तच स्लेजिंग करत होते!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि स्लेजिंगसाठी ओळखला जातो. मग ते फ्रंटफूटवर असले की त्यांच्यातील आक्रमकता अधिकच वाढते. २०१७ साली भारताविरुद्ध भारतात झालेल्या कसोटी मालिकेतही काहीसे असेच घडले होते. याबाबतची आठवण भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने सांगितली. तो इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून अश्विनशी बोलत होता.

आपण (भारताने) पहिला कसोटी सामना गमावला. त्यानंतर आपण सर्व एकत्र बसलो आणि या पराभवाबाबत चर्चा केली. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पुनरागमन करणे अवघड असते, असे पुजारा म्हणाला. पुणे येथे झालेला पहिला कसोटी सामान पाहुण्या ऑस्ट्रेलियाने ३३३ धावांनी जिंकत चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली होती. दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने आघाडी मिळवली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला त्यांनी मालिकाच जिंकली असे वाटत होते.

दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात आपण चांगली फलंदाजी केली नाही. पहिल्या डावानंतर अनिल कुंबळे (तेव्हाचे प्रशिक्षक) यांनी मला नेथन लायनला कसे खेळायचे हे सांगितले होते. मात्र, दुसर्‍या डावात फलंदाजीला जाताना मला खूप दबाव जाणवत होता. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जरा जास्तच स्लेजिंग करत होते. त्यांना वाटत होते की जणू ते सामना जिंकले आहेत. चहापानाच्या वेळी मी आणि अजिंक्य (रहाणे) पॅव्हेलियनमध्ये परतताना त्यांनी पुन्हा स्लेजिंग सुरु केली. त्याचवेळी तो सामना आपल्या बाजूने फिरला, असे पुजाराने सांगितले.

काय घडले त्या सामन्यात?
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील २०१७ सालच्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना बंगळुरुत झाला. या सामन्यात भारताचा पहिला डाव १८९ धावांत आटोपला, तर ऑस्ट्रेलियाने २७६ धावा करत पहिल्या डावात ८७ धावांची आघाडी मिळवली. पुजारा (९२), रहाणे (५२) आणि लोकेश राहुल (५१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात २७६ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी १८८ धावांचे आव्हान मिळाले. मात्र, अश्विनच्या ६ विकेटमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ११२ धावांत आटोपला आणि भारताने सामना ७५ धावांनी जिंकला. तसेच भारताने चौथा कसोटी सामना जिंकत ही मालिका २-१ अशी जिंकली.

First Published on: May 1, 2020 5:42 AM
Exit mobile version