Thailand Open : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

Thailand Open : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

पी. व्ही. सिंधू

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने थायलंड ओपन सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या किसोना सेल्वाडूरेचा २१-१०, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याचप्रमाणे पुरुष एकेरीत समीर वर्मालाही उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. समीरने दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानी असणाऱ्या डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेवर २१-१२, २१-९ अशी मात केली. समीरचा हा गेमकेवरील सलग तिसरा विजय ठरला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या आघाडीच्या जोडीने थायलंड ओपन स्पर्धेत आगेकूच केली.

सिंधूचा आक्रमक खेळ

महिला एकेरीत सायना नेहवालचा पहिल्याच फेरीत पराभव झाला होता. सिंधूने मात्र अप्रतिम खेळ सुरु ठेवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने दुसऱ्या फेरीत किसोना सेल्वाडूरेचा २१-१०, २१-१२ असा पराभव केला. या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सेल्वाडूरेला फारशी झुंज देता आली नाही. आता सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या चौथ्या सीडेड रॅटचनॉक इंटानोनशी सामना होईल.

सात्विक-चिरागची आगेकूच

पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या आघाडीच्या जोडीने थायलंड ओपन स्पर्धेत आगेकूच केली. सात्विक-चिरागने सातव्या सीडेड सोलग्यू चोई-सेऊंग सिओ या दक्षिण कोरियाच्या जोडीचा २१-१८, २३-२१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

First Published on: January 21, 2021 8:47 PM
Exit mobile version