शेवटच्या ओव्हर्समध्ये धोनी असा खेळतो की… – राहुल द्रविड

शेवटच्या ओव्हर्समध्ये धोनी असा खेळतो की… – राहुल द्रविड

कॅप्टन कूल म्हटलं की समोरच्या १० पैकी कदाचित १० लोकं एका क्षणाच्याही आत ज्याचं नाव घेतील तो म्हणजे माही अर्थात महेंद्रसिंह धोनी. धोनीची बॅटिंग, त्याची विकेट किपिंग, त्याची कॅप्टन्सी आणि त्याचा मैदानावरचा वावर या सगळ्याचीच भुरळ भारतीय क्रिकेट चाहत्यांवर पडली आहे. माही गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जितक्या जोरात सुरू आहेत, तितक्याच त्याच्याबद्दलच्या अनेकांच्या आठवणीही समोर येत आहेत. नुकतीच द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज राहुल द्रविडने धोनीच्या एका विशेष गुणाचा उल्लेख एका कार्यक्रमात बोलताना केला. धोनीच्या या गुणविशेषाचा अनुभव त्याला खेळताना पाहणाऱ्या जवळपास प्रत्येकानं घेतला असेल!

‘माझ्यात धोनीचा हा गुण कधीच नव्हता!’

इएसपीएन क्रिकइन्फोच्या व्हिडिओ चॅटमध्ये संजय मांजरेकरने राहुल द्रविडची छोटेखानी मुलाखत घेतली. यामध्ये राहुलने धोनीबद्दलच्या आपल्या आठवणी सांगितल्या. राहुल म्हणाला, ‘महेंद्रसिंह धोनी मॅचच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये इतक्या शांतपणे आणि इतक्या बिनधास्त खेळायचा, की वाटायचं त्याला मॅचचा रिझल्ट काय लागेल, कोण जिंकेल कोण हरेल याची काही चिंताच नसायची. कितीही तणावाची परिस्थिती असली, तरी धोनीवर त्याचा काही फरक पडत नव्हता. तुम्ही कोणत्याही मॅचच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये धोनीला खेळताना पाहा. तो त्याचा सर्वोत्तम खेळ करत असतो’. याशिवाय, राहुल द्रविड अशंही म्हणाला की, ‘मला वाटतं की तुमच्यामध्ये हा गुण असायला हवा किंवा तुम्ही त्यासाठी स्वत:ला ट्रेन करायला हवं. माझ्यामध्ये हा गुण कधीही नव्हता. कोणत्याही निर्णयाचा परिणाम माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असायचा. धोनीला कुणीतरी विचारायला हवं की हा त्याचा स्वभावगुण आहे की त्याने तो मेहनतीने विकसिक केला आहे’.

वर्ल्डकप सेमीफायनलनंतर धोनी खेळलाच नाही!

२००४मध्ये बांगलादेशविरूद्धच्या मॅचमध्ये माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. २००५ मध्ये पाकिस्तानविरूद्ध झालेली एकदिवसीय सीरिज धोनीने विशेष गाजवली. त्याच सीरिजच्या दुसऱ्या मॅचमध्ये धोनीने १४८ धावांची तडाखेबंद खेळी केली आणि आख्ख्या जगानं धोनीला सलाम ठोकला! धोनी हा भारताचा असा एकमेव कर्णधार आहे की ज्याने वन डे वर्ल्कप, टी २० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा क्रिकेटमधल्या तिनही मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१९मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात धोनी शेवटचा खेळताना दिसला होता. त्यानंतर मात्र, धोनीने क्रिकेटपासून अघोषित आराम स्वीकारला आहे.

First Published on: June 11, 2020 1:26 PM
Exit mobile version