खेळांची चर्चा करण्याची वेळ नाही, पण टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार!

खेळांची चर्चा करण्याची वेळ नाही, पण टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार!

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विविध देश खबरदारीची पावले उचलत आहेत. करोनाचा परिणाम खेळांच्या वेळापत्रकावरही झाला असून जगभरातील जवळपास सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, चार महिन्यांत होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. ही स्पर्धाठरल्याप्रमाणे म्हणजेच २४ जुलैपासून घेण्याचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि आयोजकांचा मानस आहे. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर सराव करण्यासाठी वेळ आणि आवश्यक सुविधा मिळत नसल्याने खेळाडूंकडून याला विरोध होत आहे. भारताची युवा नेमबाज मनू भाकर मात्र ऑलिम्पिक खेळण्यास तयार आहे.

सध्याच्या परिस्थितीत चाचणी आणि इतर सर्व स्पर्धा पुढे ढकलणे हाच योग्य निर्णय आहे. जगात खेळांपेक्षाही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे आम्ही पालन करत आहोत, असे मनू म्हणाली. नुकतेच भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (एनआरएआय) काही नेमबाजांची चाचणी स्पर्धा घेतली. या स्पर्धेत मनूचाही सहभाग होता. चाचणी स्पर्धेत थोड्याच नेमबाजांचा सहभाग होता. त्यामुळे एका ठिकाणी फार लोक एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. ही स्पर्धा तीन दिवस चालली, असे मनूने नमूद केले.

तसेच ऑलिम्पिकबाबत तिने सांगितले, मी घरीच आहे. सध्याच्या परिस्थितीचा माझ्या सरावावर आणि ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम झालेला नाही. शांत आणि संयमी राहण्यासाठी मी योगा, ध्यान यांसारख्या गोष्टी करत आहे. ऑलिम्पिक कधी होणार हे सांगणे अवघड आहे. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धा वेळापत्रकानुसारच होईल असे गृहीत धरुन मी तयारी करत आहे. नेमबाजीमध्ये पदके मिळवण्यासाठी आता खूप स्पर्धा आहे. २०१९ नंतरच्या सर्व स्पर्धांवर नजर टाकल्यास तुम्हाला हे लक्षात येईल. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करायची असल्यास खूप मेहनत घेणे गरजेचे आहे.

आयोजकांची पर्यायी योजना आखण्यास सुरुवात!
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येऊ शकते. तसे झाले तर करायचे, याची योजना आखण्यास आयोजकांनी सुरुवात केली आहे. ही स्पर्धा ठरल्याप्रमाणे न झाल्यास जपानला खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिक वेळापत्रकाप्रमाणेच होईल असे काही दिवसांपूर्वी आयोजकांकडून सांगण्यात आले होते. या स्पर्धेमुळे जपानमधील पर्यटन आणि ग्राहक खर्च वाढेल अशी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना आशा होती. परंतु, करोनाचा धोका वाढत असल्यामुळे ही स्पर्धा ठरल्याप्रमाणे होण्याची शक्यता कमीच आहे.

First Published on: March 23, 2020 4:39 AM
Exit mobile version