भारत ‘अ’ च्या दौर्‍यामुळे पदार्पण झाले सोपे

भारत ‘अ’ च्या दौर्‍यामुळे पदार्पण झाले सोपे

रिषभ पंत (फोटो प्रातिनिधीक आहे.)

इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी मालिकेच्या पहिल्या २ सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दोन्ही सामन्यांत कर्णधार विराट कोहली वगळता इतर फलंदाजांना चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यातही यष्टीरक्षक  दिनेश कार्तिकने फारच निराशाजनक प्रदर्शन केले. त्याने फलंदाजी खराब केलीच पण त्याचे यष्टिरक्षणही अगदी साधारण होते. त्यामुळे तिसर्‍या कसोटीसाठी त्याच्याजागी युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला संघात स्थान दिले गेले.

 पंतची आक्रमक खेळी

पंतनेही पदार्पणातच आपली कमाल दाखवली. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात आक्रमक २४ धावांची खेळी केली. पण त्याच्या फलंदाजीपेक्षाही त्याचे यष्टिरक्षण अधिक वाखाणण्याजोगे होते. त्याने या सामन्यात एकूण ७ झेल टिपले. इंग्लंडच्या वातावरणात चेंडू खूप स्विंग होत असल्याने यष्टिरक्षण करणे अतिशय अवघड असते. परंतु, पंतच्या म्हणण्यानुसार या मालिकेपूर्वी झालेला भारत ’अ’ चा इंग्लंड दौरा त्याच्यासाठी उपयुक्त ठरला.

” इंग्लंडमध्ये यष्टिरक्षण खूप अवघड असते. पण मी मागील अडीच महिने इंग्लंडमध्ये भारत ’अ’ च्या संघातून खेळात असल्याचा मला फायदा झाला. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेणे मला सोपे गेले. माझे पदार्पण असल्याने मी थोडासा नर्वस होतो. पण मी फलंदाजी करताना खूप विचार करत नाही. मी चेंडू बघतो आणि जर तो चेंडू मारू शकत असीन तर मारतो. हीच माझ्या खेळण्याची पद्धत आहे.”

– रिषभ पंत, युवा यष्टीरक्षक-फलंदाज

 

First Published on: August 26, 2018 11:17 AM
Exit mobile version