IND vs AUS : रोहित शर्मा सुरक्षित, सिडनीतच राहणार

IND vs AUS : रोहित शर्मा सुरक्षित, सिडनीतच राहणार

रोहित शर्मा

सिडनी येथे मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. इतकेच नाही, तर भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित सध्या सिडनी येथे क्वारंटाईनमध्ये आहे. सिडनीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला, तरी रोहित पूर्णपणे सुरक्षित असून त्याला इतरत्र हलवण्यात येणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआय सतत त्याच्या संपर्कात

रोहितला सिडनीतून इतरत्र हलवण्याची आवश्यकता नाही. तो पूर्णपणे सुरक्षित असून जैव-सुरक्षित वातावरणात क्वारंटाईनमध्ये आहे. तो त्याच्या खोलीत एकटाच असला तरी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन सतत त्याच्या संपर्कात आहे. गरज भासल्यास आम्ही रोहितला सिडनीतून इतरत्र ठिकाणी हलवू. मात्र, सध्यातरी तो सुरक्षित असून सिडनीतच राहणार आहे, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तिसरी कसोटी सिडनीमध्येच

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी ७ ते ११ जानेवारी २०२१ या कालावधीत होणार आहे. सिडनीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी कसोटी सामना ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली यांनी स्पष्ट केले आहे. तिसऱ्या कसोटीला अजून अडीच आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे सिडनीतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ असल्याचे हॉकली म्हणाले.

First Published on: December 22, 2020 7:04 PM
Exit mobile version