रुट, बर्न्सची झुंजार शतके

रुट, बर्न्सची झुंजार शतके

कर्णधार जो रुट आणि सलामीवीर रोरी बर्न्सने केलेल्या शतकांमुळे न्यूझीलंडच्या ३७५ धावांचे उत्तर देताना इंग्लंडची पहिल्या डावात तिसर्‍या दिवसअखेर ५ बाद २६९ अशी धावसंख्या होती. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात १०६ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्या ५ विकेट्स शिल्लक आहेत. इंग्लंडची २ बाद २४ अशी अवस्था असताना रुटने बर्न्सच्या साथीने तिसर्‍या विकेटसाठी १७७ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

तिसर्‍या दिवशी २ बाद ३९ वरुन पुढे खेळताना इंग्लंडच्या रुट आणि बर्न्सने अप्रतिम फलंदाजी केली. बर्न्सला १०, १९ आणि ८७ धावांवर जीवनदान मिळाले. याचा पुरेपूर फायदा घेत त्याने २०८ चेंडूत आपले कसोटीतील दुसरे शतक झळकावले. त्याला उत्तम साथ देत रुटने २५९ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीतील १७ वे, तर १५ डावांतील पहिले शतक होते.

अखेर बर्न्सला १०१ धावांवर जीत रवालने धावचीत करत ही जोडी फोडली. यानंतर बेन स्टोक्स (२६) आणि पदार्पण करणारा झॅक क्रॉली (१) फारकाळ खेळपट्टीवर टिकले नाहीत. त्यामुळे तिसर्‍या दिवसअखेर इंग्लंडची ५ बाद २६९ अशी धावसंख्या होती. रुट ११४ धावांवर नाबाद होता.

संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड : पहिला डाव – ३७५ वि. इंग्लंड : पहिला डाव – ९९.४ षटकांत ५ बाद २६९ (रुट नाबाद ११४, बर्न्स १०१; साऊथी २/६३, हेन्री १/५६).

First Published on: December 2, 2019 5:28 AM
Exit mobile version