स्मिथला फलंदाजी करताना पाहून सचिन आठवला – लँगर

स्मिथला फलंदाजी करताना पाहून सचिन आठवला – लँगर

लँगर

मागील वर्षी द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे ऑस्ट्रेलियाचा तेव्हाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. मात्र, आगामी विश्वचषकासाठी त्याचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले असून तो या स्पर्धेत चांगले कामगिरी करेल असा ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना विश्वास आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघाचे विश्वचषकासाठी सराव सत्र सुरु असून यामध्ये स्मिथने वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि नेथन कुल्टर नाईलची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे तो सध्या ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, ते पाहून मला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची आठवण झाली, असे लँगर म्हणाले.

स्मिथ हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. मी त्याला काही दिवसांपूर्वीच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सराव सामन्यांत फलंदाजी करताना पाहिले. त्या सामन्यांत आणि सध्या सुरु असलेल्या सराव सत्रात तो ज्या सहजतेने फलंदाजी करत आहे, ते पाहून मला सचिन तेंडुलकरची आठवण झाली. त्याचे संघात पुनरागमन झाल्याचा मला आनंद आहे. तो सतत आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असतो. तो आमच्याबरोबर जेवताना, बसमध्ये असतानाही फलंदाजीबाबतच विचार करत असतो. त्याला फलंदाजी करायला खूप आवडते, असे लँगर म्हणाले.

स्मिथ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याने नुकत्याच झालेल्या तीन सराव सामन्यांपैकी दोन सामन्यांत ८९ आणि ९१ धावांची खेळी केली होती. तसेच त्याने नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या १२ सामन्यांत ४० च्या सरासरीने ३१९ धावा केल्या होत्या.

First Published on: May 20, 2019 4:57 AM
Exit mobile version