बॅट दुरुस्त करणारा अश्रफ चाचा अडचणीत; क्रिकेटचा देव धावला मदतीसाठी

बॅट दुरुस्त करणारा अश्रफ चाचा अडचणीत; क्रिकेटचा देव धावला मदतीसाठी

सचिन तेंडुलकरची अश्रफ चाचा यांना मदत

भारतीय क्रिकेट संघातील मोठ मोठ्या खेळाडूंच्या बॅट दुरुस्त करणारे अश्रफ चौधरी हे आजाराशी लढत आहेत. सध्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नाहीत. याची माहिती माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर क्रिकेटचा देव म्हणून ज्याला संबोधले जाते, तो सचिन तेंडुलकर अश्रफ यांच्या मदतीसाठी धावला आहे. अश्रफ यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन सचिन तेंडुलकरने दिले आहे.

अश्रफ चौधरी हे क्रिकेट वर्तुळात ‘अश्रफ चाचा’ या नावाने लोकप्रिय आहेत. अश्रफ चौधरी हे मधुमेह आणि मिडजोन न्यिमोनिया आजाराने त्रस्त असून मुंबईच्या सावला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. बॅट व्यवसायाशी निगडीत असलेले आणि अश्रफ यांचे हितचिंतक प्रशांत जेठमलानी उपचाराच्या पैशांसाठी जुळवाजुळव करत होते. अशापरिस्थितीत आता सचिनने पुढे येऊन त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.

अश्रफ चौधरी यांनी सचिन तेंडुलकरसहीत विराट कोहली आणि कितीतरी नामी क्रिकेटपटूंच्या बॅट दुरुस्त करुन दिल्या आहेत. मात्र कोरोनाने लॉकडाऊन केल्यानंतर ते संकटात सापडले. त्यांचे आरोग्य आणि व्यवसाय दोन्हीही कोरोनामुळे अडचणीत आला. वानखेडे स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामने होत असताना ते नेहमी मैदानावर उपस्थित असायचे. केवळ भारतीयच नाही तर ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टीव्ह स्मिथ, विंडिजचा तडाखेबाज बॅट्समन क्रिस गेल आणि कायरन पोलार्ड सारख्या क्रिकेटपटूंच्याही बॅट अश्रफ चाचा यांनी फिक्स केल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदने देखील अश्रफ यांना मदतीसाठी त्यांचा पत्ता शोधण्यास सांगितले होते. दक्षिण मुंबईतील धोबी तलाव येथे अश्रफ चौधरी यांचे छोटेसे दुकान आहे. या दुकानातून अनेक मोठमोठ्या खेळांडूंनी त्यांच्याकडून बॅटची दुरुस्ती करुन घेतली, मात्र त्यांना पैसे दिले नाहीत. त्यानंतर त्यांच्या आजारपणाची बातमी माध्यमात आल्यानंतर सोनू सूदने त्यांना शोधण्याचे आवाहन केले होते.

 

First Published on: August 25, 2020 11:46 PM
Exit mobile version